दुचाकी व बोलेरो जीप अडकली, दुचाकीवरील दोघे किरकोळ जखमी
प्रतिनिधी / नागठाणे :
ग्वाल्हेर-बेंगळूर आशियाई महामार्गावर वळसे (ता.सातारा) गावच्या हद्दीतील हॉटेल इंद्रप्रस्थच्या समोर असलेले भलेमोठे वडाचे झाड रविवारी दुपारी अचानक महामार्गावर कोसळले. या कोसळलेल्या वडाच्या झाडाखाली एक दुचाकी व बोलेरो जीप अडकली. सुदैवाने जीपमधील प्रवासी बालबाल बचावले तर दुचाकीवरील दोघे किरकोळ जखमी झाले. झाड पडल्यामुळे महावितरणची झाडावरून गेलेली लाईनही तुटली. पडलेल्या झाडामुळे व तुटलेल्या विद्युत लाईनमुळे सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील वळसे गावच्या हद्दीतील हॉटेल इंद्रप्रस्थच्या समोर सातारकडे जाणाऱ्या मार्गिकेवर एक भलेमोठे वडाचे झाड एका दुचाकी आणि चारचाकी गाडीवर अचानक पडले.यावेळी दुचाकीवरून जाणारे शैलेश भोसले (वय.३५) व महेश भास्कर (वय.३२, दोघे रा. रंकाळा कोल्हापूर) हे किरकोळ जखमी झाले.तर बोलेरो जीपमधील पाच जण बालबाल बचावले.
घटनेची माहिती मिळताच हायवे हेल्पलाईनचे दस्तगीर आगा यांच्या टीमने तसेच महामार्ग वाहतूक केंद्र कराड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, सहाय्यक फौजदार राजू बागवान, पो.ना.वैभव पुजारी, रुपेश कारंडे, रायसिंग घोरपडे, देवदत्त शेडगे, हायवे मृत्यूंजय दूत नागठाणे पिंटू सुतार, सोहेल सुतार, बोरगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाजूला काढले.पडलेल्या झाडामुळे महावीतरणची विद्युत लाईनही तुटल्याने सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी सेवा रस्त्याने वाहतूक वळवून ती सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. कटर व दोन क्रेनच्या साहाय्याने पडलेल्या वडाच्या झाडाच्या फांद्या बाजूला काढल्या. अखेर तीन तासानंतर महामार्गावरील पडलेले झाड हटविल्यानंतर व महावितरणने लाईन जोडल्यानंतर वहातुक पूर्ववत सुरू झाली.