11 मशीन मोफत कोरोना बाधितांच्या सेवेत
शिवाजीराव जगताप / वाई
कोरोनामुळे माणसातला माणूस राहिला नाही. माणूसकी हरवत चालल्याचे ठिकठिकाणी दिसते आहे.परंतू काही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तीमुळे अजून ही माणूसकी टिकून आहे. त्याचाच प्रत्यय वाई येथील रोटरी क्लबच्यावतीने राबवण्यात आलेल्या मिशन ऑक्सिजन या उपक्रमामुळे येत आहे. 11 ऑक्सिजनच्या मशीन कोरोनाबाधित रुग्णाच्या सेवेकरता उपलब्ध केल्या. पहिल्याच दिवशी सर्व मशीन सेवेत रुजू झाल्या.
कोरोनाचे रुग्ण ऑक्सिजन अभावी दुर्दैवाने मृत्यू होत आहेत. सध्या कोरोनाबाधित रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. अशा कोरोनाबाधित रुग्णांना मदत करण्याच्या हेतूने माणुसकीच्या भावनेतून वाईच्या रोटरी क्लबने मिशन ऑक्सिजन हे अभियान सुरू केले. या अभियानाची सुरुवात वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी रोटरीचे अध्यक्ष अजित क्षीरसागर, डॉ. शंतनु अभ्यांकर, डॉ.जी.बी. पाटील, नितीन कदम, डॉ. अरुण पतंगे, सचिव डॉ. जितेंद्र पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे म्हणाले, सध्याच्या काळात रोटरी क्लबसारख्या पुढे येणे गरजेचे आहे. सामाजिक भान राखून लोकहिताचे उपक्रम हाती घेतले आहे.मिशन ऑक्सिजन हे अभियान कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले. वाई रोटरी क्लबने कोरोना काळातील लोकांच्या गरजा ओळखून घरच्या घरी वापरता येण्याजोगे ऑक्सिजन मशीनची सोय केली आहे. लगेच पुढील चोवीस तासात सर्वच्या सर्व मशीन विविध पेशंटसाठी वापरातही आली.एका तातडीच्या उपक्रमाला आपत्ती काळात लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला याचे समाधान असल्याचे रोटरीचे अध्यक्ष अजित क्षीरसागर यांनी सांगितले.
हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने घरच्या घरी प्रथमोपचार म्हणून वापरण्याजोगे हे उपकरण आहे. रोटरी क्लब तर्फे वाईकरांसाठी हे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. अनेक दानशूर व्यक्तींनी अधिक मदत करायची तयारीही दर्शवली आहे.या उपक्रमात डॉ. शंतनु अभ्यांकर, डॉ.जी.बी. पाटील, श्री. नितीन कदम, डॉ. अरुण पतंगे रोटरी महिला ग्रुप, इत्यादींचा सक्रिय सहभाग राहिला आहे. या साऱ्यांचे आभार मानत सचिव डॉ. जितेंद्र पाठक यांनी दानशूर व्यक्तींना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.