पेन्शन प्रस्ताव सेवानिवृत्तीपुर्वी सहा महिने अगोदर पाठवा
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग माध्यमिकच्या सवलत शाखेमधून सेवानिवृत्त शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मूळ सेवापुस्तक कार्यालयीन वेळेत घेऊन जायची आहेत.आपल्या शाळेची सेवापुस्तके न स्विकारल्यास सदरची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकाची राहील, असे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
माध्यमिक शिक्षण विभागाच्या सवलत शाखेत शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त बाबतची जी प्रकरणे येतात, त्या प्रकरणांची तपासणी केली असता बऱ्याच त्रुटी असल्याचे निदर्शनास येत आहेत. महालेखापाल, मुंबई यांचेकडील सुचनेनुसार सदर सेवानिवृत्ती प्रकरणे सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी सहा महिने अगोदर महालेखापाल, मुंबई यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. कुटुंब निवृत्तीवेतन, मृत्यूनेउपदान, कुटुंबाचा तपशील इ. विहित नमुन्यातील नामनिर्देशन फॉर्म (Nomination Proforma No.1) सेवापुर बरोबर सादर करणे आवश्यक आहे. सेवानिवृत्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे निवृत्ती आदेश नसल्याचे दिसून येते. सदरचा सेवानिवृत्ती संच ए-४ साईज पेपर वर सादर करणे अपेक्षित आहे. सेवापुस्तकामधील सर्वनोंदी आणि वार्षिक पडताळणी सेवा समाप्तीपर्यंत सेवापुस्तकामध्ये घेणे आवश्यक आहे. वेतन निश्चीती साठी घेतलेले विकल्प व विवरणपत्रे सादर करण्यात यावेत. तसेच खातेनिहाय चौकशी बाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
एका वेळी गर्दी होऊ नये म्हणून सवलत शाखा शिक्षण विभाग माध्यमिक सातारा जिल्हा परिषद सातारा या कार्यालयामधून सेवापुस्तक वाटपाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
सातारा तालुका २०/१०/२०२० व २१/१०/२०२०, कराड- २२ व २३ ऑक्टोबर २०२० , पाटण २६ व २७ ऑक्टोबर २०२०, कोरेगांव- २८ व २९ ऑक्टोबर २०२०, खंडाळा २ नोव्हेंबर २०२०, वाई ०३ नोव्हेंबर २०२०, जावली ०४ नोव्हेंबर २०२०, महाबळेश्वर- ०५ नोव्हेंबर २०२०, फलटण- ६ व ९ नोव्हेंबर २०२०,खटाव- १० नोव्हेंबर २०२०, तर माण ११ नोव्हेंबर २०२० या काळात कार्यालयीन वेळेत शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके घेऊन जाण्याची कार्यवाही करावी, असे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.