प्रतिनिधी/ सातारा
कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून सातारा शहर परिसरात खेड परिसरात सापडलेला एक बाधित रुग्ण सोडला तर सातारा शहर व तालुका ग्रीन झोनमध्ये असतानाच शहर व परिसरात तब्बल 15 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. आता शासनाच्या नवीन निकषानुसार ज्या परिसरात रुग्ण आहेत तिथे मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आले असून शहरातील पाच कंटेन्मेंट झोनमध्ये सध्या घरपोच सेवा मिळत आहे. तर या कंटेन्मेंट झोनच्या प्रवेशद्वारांवर पोलिसांचा रात्रंदिवस कडक पहारा तैनात करण्यात आलेला आहे.
सातारा शहरातील जिल्हा कारागृहात पुण्याहून शासनाने परवानगीने आणलेल्या 45 कैद्यांपैकी 9 कैदी कोरोना बाधित आढळून आले आहेत तर प्रतापगंज पेठेतील एक युवक व त्या युवकाची गेंडामाळ परिसरात राहणारी नातेवाईक बाधित आढळून आली. गार्डन सिटीमधील कराडच्या कॉटेज रुग्णालयात कार्यरत असलेली नर्स तर जिल्हा रुग्णालयातील टेक्नीशियन सहाय्यक कर्मचारी बाधित आढळली तर कोडोलीत मुंबईहून आलेला युवक बाधित आढळून आला आहे.
प्रशासनाने प्रतापगंज पेठ, गेंडामाळ, राधिका रस्त्यावरील गार्डन सिटी, कोडोलीतील रुग्ण सापडलेला परिसर, सदरबझारमधील परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन केले असून पुढील आदेश येईपर्यंत त्या परिसरातील नागरिकांना बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आलेली आहे. कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना अत्यावश्यक सेवा घरपोच पुरवण्यात येत असून त्या त्या कंटेन्मेंट झोनच्या प्रवेशद्वारांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या परवानगीशिवाय आतील कोणी बाहेर येणार नाही व बाहेरील कोणीही आत जावू शकणार नाही.
संसर्ग साखळी तोडण्याचे प्रयत्न
शहरात सध्या काही प्रमाणात अत्यावश्यक दुकाने, मेडिकल, दूध, भाजीपाला विक्री सुरु करण्यात आली असली तरी कंटेन्मेंट झोनमध्ये फक्त घरपोच सेवा उपलब्ध आहे. कोरोनाची संसर्ग साखळी तुटली पाहिजे हा प्रशासनाचा प्रय़त्न असून त्यासाठी कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांकडून चागंला प्रतिसाद लाभत आहे. सातारकरांना कोरोनाचे गांभीर्य कळले असून लॉकडाऊन यशस्वी करण्याशिवाय कोरोनाला हरवण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याने नागरिकांनी खरेदीसाठी अनावश्यक गर्दी करु नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.