प्रतिनिधी / सातारा :
‘पुष्पा नाम सुनकर प्लावर समझी क्या’ हा ‘पुष्पा’ चित्रपटाचा डायलॉग व त्यामधील गाणी सध्या सर्वत्र गाजत आहेत. त्यातच या चित्रपटातील मुख्य नायक अल्लु अर्जुन याने परिधान केलेल्या लुंगीचा ट्रेंड सध्या साताऱ्यात ही मोठय़ा प्रमाणात गाजत आहे. मुख्य म्हणजे मागील काही दिवसांपुर्वी खा. उदयनराजे भोसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत येथील सेल्फी पॉईंटवर लुंगी परिधान करून सेल्फी काढले होते. त्यामुळे सध्या साताऱ्यातील अनेक कापड व्यापाऱ्यांकडे ग्राहकांकडुन लुंगीची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
एखादा चित्रपट किंवा त्यातील कथानक गाजले की, अनेकांकडुन त्या कथानकाने चित्रपटा दरम्यान केलेल्या पेहरावाची किंवा चित्रपटातील प्रसिध्द डायलॉगची चर्चा सर्वत्र ऐवयास मिळत. अशीच काहीशी परिस्थिती सध्या साताऱ्यात निर्माण झाली आहे. कारण दक्षिणात्य चित्रपट असणारा ‘पुष्पा’ या चित्रपटाने सातारकरांवर एक वेगळीच मोहर उमटविली आहे. यापुर्वी ही खा.मा. उदयनराजे भोसले यांनी येथील ‘राजलक्ष्मी’ चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट पाहिला होता. हा चित्रपट महाराजांना ही इतक्या प्रमाणात भावला की त्यांनी ही चित्रपटातील नायकाने परिधान केलेल्या लुंगी प्रमाणे स्वत:ही लुंगी परिधान करून सेल्फी काढली आहे. तसेच त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी ही लुंगी परिधान केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा प्राचीन संस्कृतीच्या पेहरावाला पसंती देण्यात येत असल्याचे दिसुन येत आहे. महिला वर्गांकडुन ही मागील काही वर्षापासुन अनेक सन समारंभा दरम्यान प्राचीन संस्कृतीची मोहर असलेल्या नऊवारी साडींना पसंती देण्यात येते. त्यातच आता पुरूष वर्ग ही मागे पडलेले नसुन त्यांच्याकडुन ही लुंगींना पसंती देण्यात येत आहे.
उदयन महाराज हेच एक ब्रॅड
खा. उदयन महाराज हेच एक ब्रँड आहेत. त्यामुळे त्यांनी एखादी नाविन्य पुर्ण गोष्ट केली की, त्यांच्या कार्यकर्त्यांकडुन ही त्याचा अवलंब करण्यात येतो. नुकताच त्यांनी लुंगीचा पेहराव करून फोटो काढले होते. त्याचे हे फोटो सातारकरांना इतके भावले की अनेकांकडुन अशा प्रकारचा पेहराव आवर्जुन करण्यात येत आहे.
-पंकज चव्हाण
पारंपारिक काळापासुनचा पेहराव
लुंगीची क्रेझ जरी सध्या आली असली तरी, पारंपारीक काळात धोतर होतच आधीपासुनच अगदी सुटसुटीत वस्त्र म्हणून याकडे बघितले जात होते. शेतकरी वर्ग ही शेतामध्ये काम करताना लुंगीचा पेहराव अजुन ही करतात. लुंगी परिधान केल्यावर एकदम भारी वाटते. पुजा करताना ही सोहळं म्हणून लुंगीचा पेहराव आजही केला जातो.
-संतोष शेडगे
पांढऱ्या रंगाच्या लुंगीची वाढती मागणी
सध्या दुकानांमध्ये लुंगीची मागणी ग्राहकांकडुन मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे. प्रामुख्याने पांढऱ्या रंगाच्या लुंगीला अधिक पसंती देण्यात येत आहे. जवळपास 600 ते 800 रूपयांपर्यंत या लुंगी विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. आम्ही आमच्या दुकानांमध्ये उभे करण्यात आलेल्या पुतळय़ांना ही लुंगींचा पेहराव केला आहे.
– पंकज लाहोटी, पंकज क्रियेशन