पुणे / प्रतिनिधी :
स्वातंत्रसेनानी साथी एस. एम. जोशी यांचे द्वितीय पुत्र आणि एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे कोषाध्यक्ष साथी अभय जोशी यांचे वयाच्या 74 व्या वर्षी दीर्घ आजाराने गुरुवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
भारतीय वायुदलातून विंग कमांडर म्हणून निवृत्त झालेल्या अभय जोशी यांनी पाकिस्तानविरुद्धच्या दोन युद्धात सहभाग घेतला. निवृत्तीनंतर एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. अभय जोशी यांनी स्वकष्टार्जित संपत्तीतून अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य केले. तसेच कार्यकर्त्यांनाही आजारपणात व संकटात आर्थिक सहकार्य केले. धार्मिक कट्टरतावादाविरोधात त्यांनी सातत्याने भूमिका घेतले. त्याचबरोबर या विषयावर वेळोवेळी विपुल लेखनदेखील केले. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथील विद्युतदाहिनीत मध्यरात्रीच्या सुमारास कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.