वृत्तसंस्था/ लक्झम्बर्ग
डब्ल्यूटीए टूरवरील लक्झम्बर्ग खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची साथीदार शुआई झेंग यांचे दुहेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. बेल्जियमच्या बिगर मानांकित मिनेन आणि युटेव्हेनिक यांनी सानिया-शुआई यांचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
गुरुवारी तब्बल 75 मिनिटे चाललेल्या या दुहेरीच्या सामन्यात बेल्जियमच्या मिनेन आणि युटेव्हेनिक या जोडीने द्वितीय मानांकित जोडी सानिया आणि तिची चीनची साथीदार शुआई झेंग यांचा 3-6, 6-3, 10-8 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
अलीकडेच झालेल्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत झेंगने ऑस्ट्रेलियाच्या स्टोसूरसमवेत महिला दुहेरीचे जेतेपद मिळविले होते. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सानिया आणि शुआई यांनी पहिला सेट जिंकला. मात्र, त्यांना पुढील दोन सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला. बेल्जियमच्या मिनेन-युटेव्हेनिक यांचा उपांत्य फेरीचा सामना जपानच्या तृतीय मानांकित होझुमी आणि निनोमिया यांच्याबरोबर होणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये 34 वषीय सानियाला पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली होती. त्याचप्रमाणे सिनसिनाटी आणि अमेरिकन ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत सानियाला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता.