वृत्तसंस्था/ बँकॉक
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या योनेक्स थायलंड खुल्या सुपर 1000 पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे महिला एकेरीतील आव्हान दुसऱया फेरीत संपुष्टात आले तर दुखापतग्रस्त के. श्रीकांतने आपल्या प्रतिस्पर्ध्यांला पुढे चाल दिली.
गुरूवारी महिला एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात थायलंडच्या ओ.बुसानेनने सायना नेहवालचा 21-23, 21-14, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव करत पुढील फेरी गाठली. जागतिक महिला बॅडमिंटनपटूंच्या मानांकनात 12 व्या स्थानावर असलेल्या बुसानेनकडून सायनाचा हा सलग चौथा पराभव आहे. या स्पर्धेत महिला एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. टॉप सीडेड पी.व्ही. सिंधूला यापूर्वी पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली होती. पुरूष एकेरीच्या सामन्यात भारताच्या के. श्रीकांतने आपला मलेशियाचा प्रतिस्पर्धी ली झी जियाला पुढे चाल दिली आहे. उजव्या पायाचा स्नायु दुखावल्याने श्रीकांतने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याचप्रमाणे पुरूष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. इंडोनेशियाच्या मोहम्मद एहसान आणि हेंद्रा सेटीवान या जोडीने सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचा 21-19, 21-17 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला.