प्रतिनिधी / पर्वरी
साल्वादोर दू मुन्दू पंचायत क्षेत्रातील एक महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी दिल्लीहून आलेल्या या महिलेची कोरोना चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आल्यानंतर तिला मडगाव येथील कोविड इस्पितळात हलविण्यात आले आहे.
साल्वादोर दू मुन्दू पंचायतीचे सरपंच संदीप साळगावकर यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून काल शुक्रवारी पर्वरी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात पंचायत क्षेत्रातील गांगोज पाटो, तोर्ड पाटो, पैठण पाटो व धनवाडो पाटो येथे मोठय़ा संख्येने लोक एकत्र येतात. तेथे फिरताना सुरक्षित अंतर ठेवत नाहीत. तसेच मास्कचा वापरही करीत नाहीत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी नियंत्रण ठेवून लोकांना पांगविण्याची गरज आहे. त्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.