एकाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू : जिल्हय़ात दिवसभरात 22 जण पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / ओरोस / सावंतवाडी:
जिल्हय़ात शनिवारी आणखी 22 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा 1109 वर पोहोचला आहे. तर 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून कोरोना मुक्त झालेल्यांची एकूण संख्या 626 झाली आहे. सद्यस्थितीत जिल्हय़ात 464 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
दरम्यान, सावंतवाडी शहरात एकाच कुटुंबातील सातजण कोरोना पॉझिटिव्ह सापडले, तर याच कुटुंबातील एका व्यक्तीचे कोरोना टेस्टसाठी गेले असता टेस्ट करून झाल्यानंतर वाटेत टेस्टच्या भीतीने हृदयविकाराच्या धक्क्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाल्याची घटना घडली. मात्र त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. त्यांची पत्नी व मुलगा यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला. या व्यक्तीच्या भावासह सातजण मात्र कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
याच कुटुंबातील एक महिला दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. तिचा पती व मुलगा गोव्यात शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर त्यांचे नातेवाईक कुटुंबीयही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेली व्यक्ती शासकीय नोकरीतून वर्षभरापूर्वी निवृत्त झाली होती. त्यांची प्रकृती बरी नव्हती. शनिवारी सकाळी आठ वाजता ते पर्णकुटी विश्रामगृहावर कोरोना टेस्टसाठी गेले. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास टेस्ट झाल्यानंतर त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यांना नजीकच्याच उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. उपजिल्हा रुग्णालयात निधन झाल्यानंतर पार्थिव देह अंत्यविधीसाठी सावंतवाडी स्मशानभूमीत नेण्यात आला. तेथे मुलगा व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबातील अन्य काही सदस्य पॉझिटिव्ह आल्याने त्यांना अंत्यदर्शन घेता आले नाही.
याच कुटुंबातील दोघे गोव्यात पॉझिटिव्ह
शुक्रवारी सावंतवाडी इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील दुकानदार महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. त्यानंतर दुकानदार महिलेचा पती व मुलगा गोव्यात गेले होते. ते दोघेही गोव्यात पॉझिटिव्ह आढळले. हे कुटुंब माजगाव गरड भागात राहते. पण, गणपती सणासाठी ते मूळ घरी सावंतवाडी सबनीसवाडय़ात येऊन गेले होते. त्यांच्या येथील कुटुंबातील अन्य पाचजणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील सातजण एकाच दिवशी पॉझिटिव्ह आढळले आहेत.
सावंतवाडी शहरात 75 कोरोना पॉझिटिव्ह
सावंतवाडी शहरात कोरोनाचे सात रुग्ण सापडले. यात सबनीसवाडा पाच, सर्वोदयनगर, बाहेरचावाडा प्रत्येकी एक अशी रुग्णसंख्या आहे. त्यांच्या घराचा भाग कंटेनमेंट झोन करण्यात आल्याचे नगरपालिका आरोग्य विभागाचे प्रशांत टोपले यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी तालुक्यात शनिवारी दिवसभरात तेरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 180 झाली आहे.
सावंतवाडी बसस्थानकातही पोहोचला कोरोना
सावंतवाडी शहरात सर्वोदय नगरातील एकजण पॉझिटिव्ह आढळला आहे. ही व्यक्ती सावंतवाडी बसस्थानकात कंट्रोलर म्हणून कार्यरत होती. त्यांना अचानक फिट आल्याने ते तपासणीसाठी गेले असता कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे एसटी आगारतही कोरोना पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यात शनिवारी तळवडे येथे चार, तर दांडेली येथे दोन रुग्ण आढळून आले. दोडामार्ग येथे पॉझिटिव्ह आढळलेला पोलीस सावंतवाडी तालुक्यातील चराठे येथील रहिवासी असल्याने तेथील परिसर कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 13040
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 1109
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 11527
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 404
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 464
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 19
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 626
अलगीकरणातील एकूण व्यक्ती 11515
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 4267
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 205264
सद्यस्थितीत सक्रीय कंटेनमेंट झोन 170