वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन निर्णय
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी तालुक्यात व शहरात कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर दोन खासगी कोविड सेंटर सुरू करण्यात आली आहेत. सावंतवाडी-कारिवडे येथे डॉ. अजय स्वार व डॉ. मिलिंद खानोलकर यांनी साई हॉस्पिटल कोविड सेंटर सुरू केले. तर सावंतवाडीत शहरात शिवसेनेचे नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आपल्या हॉस्पिटलचे रुपांतर कोविड सेंटरमध्ये केले आहे.
तालुक्यात गेल्या महिनाभरात अडीचशेहून अधिक रुग्ण सापडले. शहरात जवळपास 50 हून अधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. पालिकेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने अन्य कर्मचाऱयांची टेस्ट करण्यात आली आहे. तालुक्यात दोन शासकीय कोविड सेंटर आता रुग्णांनी भरत आली आहेत. शहराची लोकसंख्या 25 हजार आहे. सतरा प्रभाग आहेत. आतापर्यंत सर्व प्रभागांमध्ये कोरोना रुग्ण आढळले आहेत. शहरात आतापर्यंत 498 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 430 बरे झाले. सध्या 69 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 50 हून अधिक होम आयसोलेशनमध्ये आहेत. आतापर्यंत वीसजणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, गेल्या महिनाभरात जवळपास 70 रुग्ण शहरात आढळले. तिघांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यात आतापर्यंत 1442 रुग्ण झाले. शनिवारी 41 रुग्ण आढळले आहेत. जवळपास 350 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या एप्रिल महिन्यात जवळपास 200 हून अधिक रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. सावंतवाडी येथील भोसले पॉलिटेक्निक, उपजिल्हा रुग्णालयातील समर्पित कोविड सेंटरमध्ये 18 जण उपचार घेत आहेत. समर्पित सेंटरमध्ये गंभीर रुग्णांना ठेवण्याची सोय नाही. जे रुग्ण अतिगंभीर असतात, ऑक्सिजनची गरज आहे, त्यांना ओरोस येथे पाठविले जाते.
सावंतवाडी तालुक्यात गेल्या चार दिवसात दरदिवशी 30 ते 40 रुग्ण आढळत आहेत. ही संख्या पाहता सेंटर वाढविण्यात आली आहेत. दोन खासगी व दोन शासकीय अशा चार सेंटरमध्ये बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉ. अजय स्वार, डॉ. मिलिंद खानोलकर यांनी साई कोविड सेंटर सुरू केले आहे. डॉ. जयेंद्र परुळेकर यांनीही आपल्या हॉस्पिटलमध्ये सेंटर सुरू केले आहे. दोन शासकीय आणि दोन खासगी सेंटरमध्ये 175 बेडची व्यवस्था आहे.
लस घेतलेले दोन रुग्ण पॉझिटिव्ह
गेल्या मार्चमध्ये दोन्ही लस घेतलेला एक शासकीय कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. मात्र, त्याच्यात सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे तो होम आयसोलेशनमध्ये आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सध्या तालुक्यात लस पुरवठा करण्यात आला. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध आहे. परंतु सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयात लसीचा तुटवडा भासत आहे. ग्रामीण भागातील लोकही सावंतवाडीत लस घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे गर्दी वाढत आहे. सावंतवाडीसाठी एक हजार डोस प्रत्येक आठवडय़ाला देण्याची मागणी आहे.