वार्ताहर / सावईवेरे :
सडा-सावईवेरे येथे कारगाडीला झालेल्या भीषण अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाला कारची जोरदार धडक लागल्याने हा अपघात घडला. विजयकुमार रोहिदास नाईक (42, रा. कणकवाडा-सावईवेरे) व प्रसाद रोहिदास नाईक (40, रा. कावंगाळ सावईवेरे) अशी त्यांची नावे असून रामदास साळगावकर (रा. कारवार) हा प्रसाद याचा साडू गंभीर जखमी झाला आहे. काल गुरुवारी दुपारी 2.30 वा. सुमारास सडा येथील धोकादायक उतरणीवजा वळणावर हा अपघात झाला.
फोंडा तालुक्यात आठवडय़ाभरात झालेला हा दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी 26 मे रोजी मडकई-कुंडई बगलरस्त्यावर मालवाहू ट्रक व बुलेट मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघतातच ओल्ड गोवा येथील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला होता.
विजयकुमार, प्रसाद व रामदास हे तिघेही गुरुवारी सकाळी रामदास याला कारवार येथे गावी जाण्यासाठी परवाना मिळवण्यासाठी मडगावला गेले होते. तत्पूर्वी त्यांनी फोंडा मामलेदार कचेरीत जाऊन परवान्यासंबंधी प्रक्रिया विचारुन घेतली होती. हा परवाना मडगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मिळत असल्याने तेथील काम आटोपून दुपारी हे तिघेही जीए 01 आर 5671 या क्रमांकाच्या मारुती 800 कारने सावईवेरेकडे परत येत होते. विजयकुमार हा कार चालवित होता तर प्रसाद बाजूला व रामदास हा पाठिमागच्या सिटवर बसला होता.
घराजवळ पोहोचले असता काळाचा घाला
घरापासून काही अंतरावर पोचले असताना सडा सावईवेरे येथील उतरणीवजा वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडावर आदळली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, विजयकुमार याचा जागीच मृत्यू झाला तर प्रसाद याला अत्यवस्थ स्थितीत उपचारासाठी गोमेकॉत नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. रामदास हा गंभीर जखमी झाला असून त्यावर गोमेकॉत उपचार सुरु आहेत.
अपघाताचा आवाज ऐकून आसपास राहणारे लोक घटनास्थळी धावले. झाडाला जोरदार धडक लागल्याने कारचा दर्शनी भाग पूर्णपणे चेपला गेला होता. आंतमध्ये अडकलेल्या प्रसाद व रामदास यांना घटनास्थळी पोचलेल्या लोकांनी बाहेर काढले. पण स्टेअरिंगजवळ अडकून पडलेला विजयकुमार याचा मृतदेह नंतर अग्निशामक दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. फोंडा पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक रश्मी भाईडकर व हवालदार सुधाकर गावकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. निरीक्षक मोहन गावडे यांनीही घटनास्थळी भेट दिली.
मयत विजयकुमार हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई व दोन भाऊ आहेत. एका खासगी वाहनावर चालक म्हणून तो कामाला होता. प्रसाद हा विवाहित असून त्याची पत्नी दुबईला नोकरीला असते. त्याच्या पश्चात आई, पत्नी व एक मोठा भाऊ असा परिवार आहे. गावातच तो छोटी मोठी कामे करुन उदरनिर्वाह करायचा. या दोघांच्याही अपघाती मृत्यूमुळे सावईवेरे भागात शोककळा पसरली आहे.