प्रतिनिधी / कोल्हापूर
महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रूग्णालयात लवकरच हृदयरोग तपासणी विभाग सुरू होणार आहे. सीपीआरमधील हृदयरोग तज्ञ डॉ. विदुर कर्णिक विना मोबदला वैद्यकीय सेवा देणार आहेत. या संदर्भात त्यांनी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना पत्र देखील पाठविले आहे. माजी नगरसेवक ईश्वर परमार यांनी शहरातील गोरगरीब कुटुबांतील हृदयरोगाच्या रूग्णांना माफक दरात उपचार मिळावेत, यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांना यश आले आहे.
शहरात हृदयविषयक रोगांवर खासगी हॉस्पिटलच्या बरोबरीने सीपीआरमध्ये तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया केली जाते. महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये हृदयरोगविषयक उपचार सुविधा नाही. शहरातील गोरगरीब, सर्वसामान्य घरातील हृदयरोगाच्या रूग्णांना दिलासा मिळावा, यासाठी माजी नगरसेवक ईश्वर परमार यांनी सावित्रीबाई फुले रूग्णालयात हृदयरोग तपासणी सुविधा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. यासाठी त्यांनी सीपीआरमधील हृदयरोग विभागातील डॉ. विदुर कर्णिक यांच्याशी संपर्क करून त्यांना सावित्रीबाई फुले रूग्णालयात मोफत सेवा देण्याविषयी विनंती केली होती. महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याबरोबर डॉ. कर्णिक यांचा संवाद घडवून आणला होता. तसेच संकल्पनाही विषद केली होती. प्रशासक डॉ. बलकवडे या स्वतः डॉक्टर आहेत. त्यांनी संकल्पनेचे स्वागत करताना डॉ. कर्णिक यांना मानसेवी तत्वावर सेवा देण्यास तयार असल्याबद्दल महापालिकेला पत्र देण्यास सांगितले होते. त्यानुसार डॉ. कर्णिक यांनी प्रशासक डॉ. बलकवडे यांना आपण सावित्रीबाई फुले रूग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा देण्यास तयार असल्याचे पत्र दिले असून केवळ तपासणीसाठी एक खोली, टेबल, बेडची सुविधा देण्याची विनंती केली आहे. हृदयरोग्याला तपासाण्यासाठी इको मशिनची गरज आहे. मात्र डॉ. कर्णिक यांनी स्वतःकडील पोर्टेबल इको मशिन सावित्रीबाई फुले रूग्णालयात वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ते वापरण्यासाठी त्यांनी प्रशासक डॉ. बलकवडे यांना दिलेल्या पत्रात परवानगी मागितली आहे.
डॉ. विदुर कर्णिक हे केंबळी ता. कागल येथील आहेत. एमबीबीएसची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी एमडी (मेडिसिन) केले आहे. ते डीएनबी कार्डिऑलॉजी देखील आहेत. 2000 पासून ते वैद्यकीय सेवेत आहेत. सीपीआरमध्ये गेली अडीच वर्षे ते हृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
दर शनिवारी तपासणी
सावित्रीबाई फुले रूग्णालयात दर शनिवारी डॉ. विदुर कर्णिक हृदयरोगाच्या रूग्णांची तपासणी करतील. त्यांना आवश्यक तो वैद्यकीय सल्ला देतील. शस्त्रक्रियेची गरज असल्यास त्या दृष्टीने सल्ला, मार्गदर्शन आणि समुपदेशन करणार आहेत. सावित्रीबाई फुले रूग्णालयातील या सुविधेमुळे सीपीआरवरील ताण भविष्यात कमी होण्यास मदत होईल.
हृदयासंदर्भात त्रास असलेल्या सर्वसामान्य घरातील रूग्णांना मोफत, माफक दरात उपचार, मार्गदर्शन आणि सल्ला मिळावा, यासाठी डॉ. कर्णिक यांना आग्रह केला होता. त्यांनी सहमती दर्शवली. प्रशासक डॉ. बलकवडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
-ईश्वर परमार, माजी नगरसेवक