प्रतिनिधी /बेळगाव
उच्चशिक्षण विभागाच्यावतीने रिक्त असलेल्या साहाय्यक प्राध्यापकांच्या जागा भरून घेण्यासाठी ऑक्टोबर 2021 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. सरकारी पदवी महाविद्यालयांमध्ये साहाय्यक प्राध्यापकांच्या जागा भरून घेतल्या जाणार आहेत. 1 हजार 242 पदांसाठी तब्बल 30 हजार अर्ज दाखल झाले आहेत.
रिक्त असलेल्या साहाय्यक प्राध्यापकांच्या जागा डिसेंबर 2021 मध्ये प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून भरून घेतल्या जाणार होत्या. परंतु कर्नाटक परीक्षा विभागाने या परीक्षा पुढे ढकलल्या. सध्या कर्नाटक परीक्षा विभाग इतर जागा भरून घेण्यामध्ये व्यस्त असल्यामुळे ही प्रक्रिया खोळंबली आहे. दाखल झालेल्या अर्जांपैकी सर्वाधिक अर्ज हे कन्नड व इतिहास या दोन विषयांना आले आहेत.
अर्जदारांना नेट, के-सेट अथवा पीएचडी नियमावलीची सक्ती करण्यात आलेली नाही. सध्या 3 हजार 900 साहाय्यक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. परंतु राज्याच्या महसूल विभागाने यापैकी केवळ 1 हजार 242 जागा भरून घेण्याचे निर्देश दिले आहेत. या एकूण जागांपैकी 2015 पासून 145 जागा रिक्त होत्या. तर 1097 जागा या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आल्या आहेत. एकूण 25 विषयांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. अर्थशास्त्र-72, कन्नड-105, इतिहास-108, समाजशास्त्र-96, वाणिज्य-171, भौतिकशास्त्र-74, रसायनशास्त्र -82, वनस्पतीशास्त्र-51, इंग्लिश-34 यासह इतर विषयांच्या जागा भरून घेतल्या जाणार आहेत.
उच्चशिक्षण विभागाच्यावतीने क वर्गांतर्गत 5 टक्के जागा मंजूर करण्यात आल्या आहेत. कन्नड व इंग्रजी या भाषांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. कन्नड व इंग्रजी या दोन भाषा वगळता इतर विषयांची प्रश्नपत्रिका बहुपर्यायी घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत. लेखी परीक्षेच्या आधारे अंतिम निवड केली जाणार आहे. युजीसीच्या नियमावलीनुसार 57 हजार 700 ते 1 लाख 82 हजार वेतन दिले जाणार आहे.