कुर्डुवाडीत कोरोनाचा झाला शिरकाव; एकूण बाधित रुग्ण ३४
प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात रिधोरे, भोसरे, चिंचगाव, दारफळ, लऊळ, मोडनिंब, दगडअकोले ,आकुंभे पाठोपाठ आता कुर्डुवाडीतही कोरोनाचा शिरकाव झाला असून शहरात दोन नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. याबरोबरच भोसरे येथे एक ,रिधोरे येथे ४ कोरोनाबाधित रुग्ण हे पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
आजपर्यंत तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २७ वरुन ३४ पोहचली आहे. आतापर्यंत यातील लऊळ व चिंचगाव येथील एक महिला व मोडनिंब येथील एक पुरुष असा तीघाजणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रशांत पलंगे यांनी दिली. कुर्डुवाडी हे रेल्वे शहर जंक्शन असून तालुक्यातील महत्वाची शासकीय कार्यालये हे कुर्डुवाडीतच असल्याने शहरात मोठी वर्दळ असते. कोरोनाचा शिरकाव कुर्डुवाडी झाल्यामुळे तालुक्याच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.