प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध ठिकाणी ट्राफिक सिग्नल उभारण्यात आले आहेत. ग्लोब थिएटरसमोरील चौकात उभारण्यात आलेला ट्राफिक सिग्नल सुरू करण्यात आला होता. मात्र काही अडचण निर्माण झाल्याने येथील ट्राफिक सिग्नलच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी दुपारी हाती घेण्यात आले होते. त्यामुळे फिशमार्केट दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती.
येथील चौकात वाहतुकीची कोंडी होत असल्याने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ट्राफिक सिग्नल उभारण्यात आले आहेत. सदर सिग्नल प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले होते. पण वाहतूक नसलेल्या सिग्नलचा वेळ कमी करण्याची गरज होती. मात्र, हे दुरुस्तीचे काम करण्यात आले नसल्याने खानापूर रोडवर सिग्नलमुळे वाहनांच्या रांगा लागत होत्या. कॅन्टोन्मेंट कार्यालयाच्या संरक्षक भिंतीमुळे ट्राफिक सिग्नल व्यवस्थित दिसत नव्हता. ट्राफिक सिग्नलचे दिवे वाहनधारकांना दिसण्यासाठी दुरुस्तीचे काम गुरुवारी दुपारी हाती घेण्यात आले होते. त्यामुळे येथील रस्ता काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. या मार्गावरील वाहतूक पोस्टमन मार्गाने वळविण्यात आली होती. परिणामी फिशमार्केट परिसरात वाहतूक केंडी निर्माण झाली होती.