वृत्तसंस्था/ ऍकापुल्को
ग्रीसच्या अग्रमानांकित स्टेफानोस सित्सिपसने फेलिक्स ऑगर ऍलियासिमेचा पराभव करून एटीपी हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असणाऱया सित्सिपसची उपांत्य लढत पात्रता फेरीतून आलेल्या इटलीच्या लॉरेन्झो मुसेटीशी होणार आहे. सित्सिपसने ऑगर ऍलियासिमेचा 7-5, 4-6, 6-3 असा पराभव केला. मुसेटीनेही संघर्षपूर्ण लढतीत पाचव्या मानांकित बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हचे आव्हान 6-4, 7-6 (7-3) असे संपुष्टात आणत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. 19 वर्षीय मुसेटीची उपांत्य फेरी गाठण्याची कारकिर्दीतील ही दुसरी वेळ आहे. त्याने भाग घेतलेली ही चौथी एटीपी स्पर्धा आहे. दुसरा उपांत्य सामना द्वितीय मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्ह व डॉमिनिक कोएफर या जर्मनीच्या खेळाडूंत होणार आहे. नॉर्वेच्या कॅस्पर रुडने मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे उपांत्यपूर्व सामन्यातून माघार घेतल्याने व्हेरेव्हला पुढे चाल मिळाली तर कोएफरने ब्रिटनच्या कॅमेरॉन नोरीवर 7-5, 6-4 अशी मात करून उपांत्य फेरी गाठली आहे.