ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्राझेनेका यांनी तयार केलेल्या कोरोना लसीची चाचणी करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने लसीच्या दुष्परिणामांचा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे.’कोविशिल्ड’ची लस पूर्णपणे सुरक्षित असून, तपास यंत्रणांनीही हे मान्य केले आहे.
चेन्नईत ‘कोविशिल्ड’ लसीच्या चाचणीत सहभागी झालेल्या एका 40 वर्षीय व्यक्तीने लसीचे गंभीर दुष्परिणाम दिसून आल्याचा दावा केला होता. त्याने व्हर्च्युअल न्यूरॉलॉजिकल ब्रेकडाऊनसारख्या समस्येचाही सामना करावा लागल्याचे सांगत कंपनीकडे 5 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली होती. सिरम इन्स्टिट्यूटने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
सिरमने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘कोविशिल्ड’ पूर्णपणे सुरक्षित आणि इम्युनोजेनिक आहे. लसीच्या चाचणीदरम्यान चेन्नईच्या सहभागी स्वयंसेवकाला कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही. सर्व नियामक आणि नैतिक प्रक्रिया आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले. युवकांच्या आरोपावर डीएसएमबी आणि नीतिमत्ता समितीचे मुख्य संशोधक म्हणाले की, सहभागीला भेडसावणारी समस्या लस चाचणीशी संबंधित नव्हती. खोटे आरोप केल्याप्रकरणी त्याला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.