भूतानच्या क्षेत्रात पुन्हा ड्रगनचा शिरकाव- भारताला सतर्क रहावे लागणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पूर्व लडाखच्या मार्गे घुसखोरी करू पाहणाऱया चीनला भारतीय सैन्याने रोखले आहे. पण विस्तारवादी चीन स्वतःचा हेतू पूर्ण करण्यासाठी ‘मागील’ दाराने भारतात घुसण्याचा प्रयत्न करत आहे. चीनची नजर भारतासाठी महत्त्वपूर्ण सिलीगुडी कॉरिडॉरवर केंद्रीत झाली आहे. या कॉरिडॉरला भारताचे ‘चिकन नेक’ देखील म्हटले जाते. चीन तिबेटच्या क्षेत्रातील चुंबी खोऱयात स्वतःची संपर्कयंत्रणा मजबूत करत आहे. हा भाग भारताच्या सिलीगुडी कॉरिडॉरनजीक आहे.
सिलीगुडी कॉरिडॉर व्यापारी आणि भौगोलिक तसेच सामरिक दृष्टय़ा देखील भारताचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. चीन चुंबी खोऱयात एका पर्यायी मार्गाची निर्मिती करत आहे, जो सिलीगुडी कॉरिडॉरनजीक आहे. चिनी सैन्य भूतानच्या क्षेत्रात रस्त्याची निर्मिती करत स्वतःची स्थिती मजबूत करू पाहत आहे.
उपग्रहीय छायाचित्राद्वारे खुलासा
हाय रिजोल्युशन उपग्रहीय छायाचित्रात चीनकडून भूतानी क्षेत्रातून तोरसा नदीच्या काठावर रस्ते निर्मिती केली जात असल्याचे दिसून आले होते. सीमा वादावर तोडगा काढण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी भूतान आणि चीन यांच्यात तीन टप्प्याच्या रोडमॅपसंबंधी अलिकडेच झालेला करार यासंबंधी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
तज्ञांकडून चिंता व्यक्त
संरक्षण विषयक तज्ञ ब्रह्मा चेलानी यांनीही चीनच्या निर्मितीकार्यावर चिंता व्यक्त केली आहे. सर्वांच्या नजरा लडाखमध्ये सीमावर्ती क्षेत्रांमधील पीएलएच्या अतिक्रमणावर आहेत, अशा स्थितीत चीन गुपचूपपणे अन्यत्र स्वतःची आक्रमक क्षमता वाढवत आहे. यात भारताच्या चिकन नेकनजीक भूतानच्या क्षेत्रात रस्त्यांची निर्मिती सामील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सिलीगुडी कॉरिडॉरचे महत्त्व
पश्चिम बंगालमधील हा पट्टा 60 किलोमीटर लांबीचा आणि 20 किलोमीटर रुंदीचा असून तो ईशान्य भागाला उर्वरित देशाशी जोडतो. हा महत्त्वपूर्ण व्यापारी मार्ग असण्यासोबत दक्षिणपूर्व आशियासाठी महत्त्वाचे ‘प्रवेशद्वार’ आहे. हे क्षेत्र अनेक आंतरराष्ट्रीय सीमांनी वेढलेले असून यात बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि चीन सामील आहे. चिकन नेक कॉरिडॉरपासून तिबेटचे चुंबी खोरे केवळ 130 किलोमीटर अंतरावर आहे. या खोऱयानजीक भारत, नेपाळ आणि भूतानचे ट्रायजंक्शन असून ज्याला डोकलाम क्षेत्र म्हणून ओळखले जाते. या कॉरिडॉरद्वारेच सीमेवरील सैनिकांना सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यात येते. युद्धाच्या स्थितीत सिलीगुडी कॉरिडॉरच्या माध्यमातून सहजपणे शस्त्रास्त्र आणि सैनिकांची जुळवाजुळव केली जाऊ शकते.