प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेच्यावतीने पोवई नाका ते जिल्हा रुग्णालय ते सदरबाजार या रस्त्याचे खड्डे मुजवण्याचे काम सध्या सुरु आहे. हे काम अतिशय निकृष्ट पद्धतीचे होत आहे, असा आरोप सातारा शहर शिवसेनेच्यावतीने करण्यात आलेला आहे. हे काम दर्जेदार करण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश मोरे, उपशहरप्रमुख गणेश अहिवळे यांनी दिला आहे. दरम्यान, या रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणारी ही खडी अतिशय हलक्या स्वरुपाची आहे. डांबराचे व खडीचे प्रमाण योग्य नाही, असा आरोप करण्यात आलेला आहे.
सातारा शहरातील पोवई नाका ते जिल्हा रुग्णालय ते सदरबाजार या रस्त्यावर खड्डेच खड्डे गेल्या दोन वर्षापासून पडलेले आहेत. हे खड्डे बुजवावेत, रस्ता चांगला करावा अशी मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार रस्त्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. परंतु हे काम शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी पाहिले असता अतिशय दर्जाहिन असे सुरु आहे. शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे झाले पाहिजेत. शहरातील रस्त्यांची कामे होताना ही शहरातील नागरिकांच्या पैशातून होत असतात. होत असलेले काम हे ठेकेदाराकडून काम उरकायचे म्हणून दर्जाहिन असे केले जात आहे. खड्डा मुजवताना खडीचे जे प्रमाण पाहिजे ते वापरले जात नाही खड्डा एकरुप करताना खड्डय़ात टाकण्यात येणारी खड्डी आणि डांबर यांचे प्रमाणही चुकीचे आहे. त्यावर टाकण्या येणारा अस्तिरीकरणाचा थर योग्य असा टाकला जात नाही. त्यामुळे हे काम चांगल्या दर्जाचे करण्यात यावे, अन्यथा शिवसेनास्टाईलने आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा दिला आहे.