5 ते 6 हजार कोरोना तपासणी अहवाल प्रलंबित
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ात पहिल्या लाटेत ज्या आरोग्य विभागाने गांभीर्याने काम केले. शासनानेही सुविधा वाढवत नेल्या. विविध हजारो आरोग्य कर्मचारी भरले. त्यामुळे कामाला गती आली होती. दुसऱया लाटेत याचा फायदाही झाला. मात्र, त्यानंतर सरकारी व खासगी आरोग्य विभागाला बेशिस्तीने ग्रासल्याने कोरोना आकडेवारी, मृत्यूची आकडेवारीतील घोटाळे समोर आले. आता आरोग्य विभागातील कर्मचाऱयांना कमी केल्याने कोटय़वधी रुपये खर्च करुन जिल्हा शासकीय रुग्णालयात आणलेली आरटीपीसीआर लॅब मशीन बंद अवस्थेत असून सध्या जिल्हाभरातील 5 ते 6 हजार कोरोना सँपल पेंडिग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
जिल्हय़ात सध्या दहा हजारांच्या पुढे तपासणी करण्यात येत असल्याचे आकडे प्रशासनाकडून येत आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टिंगपेक्षा रॅट टेस्टिंग मोठय़ा प्रमाणावर होत आहे. मध्यंतरी आयसीएमआर पोर्टलवर खासगी व शासकीय लॅबकडून टेस्टिंगची आकडेवारी, मृत्यू झालेल्यांची नोंद अपडेट होत नसल्याने अनेकविध समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याबाबत ‘तरुण भारत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर ती आकडेवारी सुरळीत करण्यासाठी मुदत दिली होती. आता बाधितांची आकडेवारी सुरळीत होत असताना मृत्यूदर घसरत असल्याचा दिलासा लाभत असताना कर्मचारी काढून टाकल्याने नवीन संकट आरोग्य विभागासमोर उभे राहिले आहे.
साताऱयात सध्या 9 हजार 956 उपचारार्थ रुग्ण संख्या असताना दैनंदिन 500 च्या पटीत बाधित वाढ सुरु असताना आरोग्य विभागातील लॅब टेक्निशियन, डेटा एंट्री ऑपरेटर, आरोग्य सेवक जे कोरोना संसर्ग संपेपर्यंत अशा पध्दतीने भरले होते. त्यांना कोणतीही एक महिन्यापूर्वी पूर्वसूचना, नोटीस न देता अचानकपणे राज्य शासनाच्या निर्णयानुसार कमी करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना कालावधीत आरोग्य विभागाला चांगली साथ दिलेल्या कर्मचाऱयांवर अन्याय झाल्याने त्यांचे न्याय मागण्यासाठी आंदोलन सुरु आहेत.
यामध्ये कर्मचारी काढून टाकल्याने त्याचा परिणाम सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात कोटय़वधी रुपये खर्च करुन आणलेली आरटीपीसीआर टेस्टिंग मशीन बंद पडण्यावर झाला आहे. कारण त्या विभागातील कर्मचाऱयांवर देखील नोकरी जाण्याची टांगती तलवार असून 30 ऑगस्टपासून आरटीपीसीआर टेस्टिंग मशीन बंद असल्याने या लॅबमध्ये पाच ते सहा हजारांपेक्षा जास्त कोरोना स्वॉब तपासणीअभावी पेंडिंग पडलेले आहेत.
मुंबईच्या थायरोकेअरकडून तपासणी सुरु
आरटीपीसीआर टेस्टसाठी घेतलेले स्वॉब आता मुंबईतील थायरोकेअर लॅबकडून तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. मात्र, स्वॉब घेतलेल्या रुग्णांची आरसीएमआर पोर्टलवर नोंदणी झाल्याशिवाय व एक्सेल फॉरमॅटमधील अहवाल दिला तरच थायरोकेअर स्वॉब तपासणीसाठी घेते. हे काम करणारे कर्मचारीच काढून टाकण्यात आल्याने हे काम जवळपास ठप्प झाले आहे. तर जिल्हय़ात आरपीटीसीआर टेस्टिंग असताना मुंबईच्या लॅबकडून तपासणी करुन घेवून त्यांना बिले अदा करावी लागत आहेत. हा प्रकार धक्कादायकच आहे.
लॅबच्या कर्मचाऱयांवर टाकला जातोय दबाव
कामावरुन काढून टाकल्याने आरोग्य कर्मचाऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. इकडे लॅबचे काम बंद पडले असून तेथील कर्मचारी आंदोलन सहभागी झाल्याने या कर्मचाऱयांकडून प्रशासनातील वरिष्ठांकडून काम सुरु करा अन्यथा नवीन भरती करु, अशा धमक्या दिल्या जात असल्याची माहितीही समोर आलीय. मात्र, काम सुरु करतो पण आम्हाला लेखी ऑर्डर द्या, असे कर्मचाऱयांचे म्हणणे आहे. या प्रकारात जिल्हय़ासाठी खरेदी केलेली कोटय़वधी आरटीपीसीआर टेस्टिंग मशीन सध्या बंद अवस्थेत आहे.