नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (आयजीएल) दिल्लीत पुन्हा एकदा सीएनजीच्या किमती वाढवल्या आहेत. सीएनजीच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढीव दरांची अंमलबजावणी रविवारपासूनच तातडीने लागू करण्यात आली आहे. दरवाढीनंतर दिल्लीत सीएनजीची किंमत 73.61 रुपये प्रतिकिलो झाली आहे. तसेच नोएडा, गाझियाबादमध्ये एक किलो सीएनजीसाठी 76.17 रुपये मोजावे लागतील, तर गुरुग्राममध्ये 81.94 रुपये मोजावे लागतील. सध्या सीएनजीच्या दरात वाढ झाली असली तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या 38 दिवसांपासून स्थिर पातळीवर असल्याने वाहनधारकांना तूर्तास किंचित दिलासा मिळाला आहे.