काम युद्धपातळीवर सुरू : तळमजल्यात पार्किंगची व्यवस्था
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या सीबीटी बसस्थानकाच्या कामाला चालना देण्यात आली आहे. त्यामुळे तिसऱया मजल्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. शहरांतर्गत बससेवेसाठी सीबीटी बसस्थानकाची उभारणी केली जात आहे. त्याबरोबर विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सुसज्ज असे बसस्थानक उभारले जात असल्याने या ठिकाणी शहरांतर्गत सर्व बस थांबण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
बसस्थानकाच्या उभारणीसाठी स्मार्ट सिटी अंतर्गत 102 कोटीचा निधी खर्ची घातला जात आहे. जुने बसस्थानक हटवून त्या ठिकाणी आधुनिक नियोजनबद्ध बसस्थानक साकारले जात आहे. या बसस्थानकाच्या तळमजल्यात दुचाकी आणि चारचाकांसाठी पार्किंग व्यवस्था आणि पहिल्या व दुसऱया मजल्यावर कार्यालयीन कामकाज चालणार आहे. यामध्ये विभागीय नियंत्रक आणि बसपास विभागासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. त्याबरोबर सर्व बस एकत्र थांबण्यासाठी फलाट उभारला जाणार आहे.
प्रवाशांची वाढती संख्या आणि अपुरी जागा लक्षात घेऊन नवीन सुसज्ज बसस्थानक उभारण्यात येत आहे. या आधुनिक बसस्थानकात शौचालय, पाण्याची व्यवस्था, फलाट, पार्किंग व्यवस्था, कँटीन आणि इतर सुविधा पुरविल्या जाणार आहेत. याबरोबर सीबीटी आणि मध्यवर्ती बसस्थानक भुयारी मार्गाने जोडण्यात आले आहे. त्यामुळे एका बसस्थानकातून दुसऱया बसस्थानकात प्रवाशांना जाणे सोयिस्कर होणार आहे.
वाहतूक कोंडी रोखण्यासाठी भुयारी मार्ग
बसस्थानकात प्रवाशांची आणि पादचाऱयांची संख्या अधिक असते. दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे. कोरोनामुळे मध्यंतरी बसस्थानकाचे काम थांबले होते. त्यानंतर कामाला गती प्राप्त झाली आहे. दोन मजल्यांची स्लॅबभरणी पूर्ण झाली आहे. तिसऱया मजल्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बसस्थानकाचे काम लवकरच पूर्णत्वाकडे येईल आणि बसस्थानक प्रवाशांसाठी सज्ज होईल, असे प्रवाशांना वाटत आहे.