सरिता पाटील यांची शरद पवारांकडे मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
सीमाभागातील अनेक मराठी विद्यार्थी महाराष्ट्रात जाऊन उच्चशिक्षण घेतात. त्यांना सीमाभागातील विद्यार्थी म्हणून काही प्रमाणात सवलत देण्यात येते. अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना एमकेबी कोटय़ांतर्गत जागा देण्यात आल्या आहेत. परंतु या जागा सध्या कमी पडत असून त्या वाढवून द्याव्यात, या मागणीसाठी सोमवारी माजी महापौर सरिता पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
महाराष्ट्राने दावा केलेल्या 865 खेडी व बेळगाव शहर येथील लोकसंख्या वाढत आहे. मराठी भाषिकांना कर्नाटकात संधी उपलब्ध नसल्याने हे विद्यार्थी महाराष्ट्रात जाऊन उच्चशिक्षण घेत आहेत. महाराष्ट्र सरकारने 25 वर्षांपूर्वी सीमाभागातील जनतेला 7 जागा देऊ केल्या होत्या. परंतु सध्या या जागा कमी पडत असल्याने त्या वाढवून देण्याची मागणी सरिता पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.
सीमाप्रश्नावर झाली चर्चा
माजी महापौर सरिता पाटील यांनी शरद पवार यांच्याशी सीमाप्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली. पवार यांनी सीमाभागातील मराठी जनतेविषयीची माहिती त्यांच्याकडून घेतली. यापुढेही सीमाप्रश्नासाठी कार्यरत राहू, असे आश्वासन दिले. त्यासोबत राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी विराज पाटील, अमित देसाई आदी उपस्थित होते.