लग्न म्हणजे धमाल, मजा, मस्ती. भरपूर खरेदी, सततची होणारी धांदल आणि गडबड. लग्नप्रसंगी महिलांना छान मिरवता येतं. वेगवेगळ्या प्रकारचे, स्टाईलचे कपडे घालता येतात. मात्र उन्हाळ्यातलं लग्न थोडं वैतागवाणं ठरतं. लग्नात भरजरी साडय़ा, ड्रेस आणि लेहंगा चोली घालावी लागते आणि उन्हाळ्यात असे कपडे घालणं कठीण होऊन बसतं. अंगावरून ओघळणार्या घामाच्या धारा सगळ्या लूकचा विचका करून टाकतात. अशा परिस्थितीत चिकनकारी लेहंगा तुम्हाला कूल लूक देऊ शकतो. अर्थात चिकनकारी लेहंगा-चोलीची स्टायलिंग योग्य पद्धतीने व्हायला हवी. त्यावर ट्रेंडी ज्वेलरी आणि ऍक्सेसरीज घालणं आवश्यक आहे. बॉलिवूडमध्येही चिकनकारी लेहंग्याची बरीच क्रेझ आहे. म्हणूनच बॉलिवूड अभिनेत्रींकडून काही स्टायलिंग टिप्स घेता येतील.
- आलिया भट्टने मध्यंतरी बेज रंगाचा चिकनकारी लेहंगा घातला होता. इंडो-वेस्टर्न लूकसाठी लेहंग्यावर शर्ट घालता येईल. आलियानेही बेज रंगाचा शर्ट कॅरी केला होता. कॉलरवाला शर्ट अशा लेहंग्यांवर शोभून दिसेल. तसंच तुम्हाला दुपट्टाही घ्यावा लागणार नाही.
- चिकनकारी लेहंगा आणि शॉर्ट चोली हे कॉम्बिनेशनही हिट आहे. कियारा अडवाणीने अशा पद्धतीचा लूक केला होता. तिने फिकट गुलाबी रंगाचा लेहंगा आणि चोली कॅरी केला होता. त्यावर ट्रेंडी दुपट्टा घेतला होता. चिकनकारी लेहंग्यावर तुम्ही डायमंड, पोलकी, कुंदन किंवा रूबीचे दागिने घालू शकता.
- बाजारात वेगवेगळ्या रंगांचे चिकनकारी लेहंगे मिळतात. सकाळच्या लग्नासाठी तुम्ही फिकट रंगाचे तर रिसेप्शनसाठी गडद रंगाचे लेहंगे घेता येतील. अथाया शेट्टीने अशाच एका कार्यक्रमासाठी फिकट निळ्या रंगाचा चिकनकारी लेहंगा आणि चोली घातली होती. तुम्ही बेबी पिंक, पिच, आकाशी, पिस्ता,येलो, लाईट ऑरेंज, पर्पल अशा रंगांचे चिकनकारी लेहंगा चोली घालू शकता.