वृत्त संस्था/ अबु धाबी
संयुक्त अरब अमिरातमध्ये 13 वी आयपीएल क्रिकेट स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघातील वेंडीजचे क्रिकेटपटू अष्टपैलू सुनील नरेन आणि आंद्रे रस्सेल अबु धाबीत रविवारी दाखल झाले. त्याचप्रमाणे कोलकाता नाईट रायडर्सचे प्रमुख प्रशिक्षक न्यूझीलंडचे बेंडॉन मेकॉलम आणि फिरकी गोलंदाज ख्रिस ग्रीन यांचेही येथे आगमन झाले.
कोरोना महामारीसाठी खबरदारीचे उपाय म्हणून या स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल होणाऱया सर्व क्रिकेटपटू, प्रशिक्षक वर्गासाठी सहा दिवसांच्या कालावधीकरिता क्वारंटाईनची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघात दाखल होण्यासाठी आलेल्या वरील सर्व व्यक्तींना त्यांच्या हॉटेलमधील खोलीत सहा दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येणार आहे. यानंतर प्रत्येक व्यक्तींची तीनवेळा कोरोना चांचणी घेण्यात येईल. या चांचणीत ते निगेटिव्ह असतील तर त्यांना आपल्या संघ सहकाऱयासमवेत प्रशिक्षण सरावात दाखल होता येईल. 13 वी आयपीएल क्रिकेट स्पर्धा 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातमधील दुबई, अबु धाबी आणि शारजाह या तीन शहरामध्ये खेळविली जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा या स्पर्धेतील पहिला सामना 23 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स संघाबरोबर होणार आहे.