महिला टी-20 चॅलेंज : सुपरनोव्हाजला हॅट्ट्रिकची संधी
वृत्तसंस्था/ शारजा
महिलांच्या टी-20 चॅलेंजची अंतिम लढत सोमवारी येथे होणार असून विद्यमान विजेत्या सुपरनोव्हाज संघ जेतेपदाची हॅट्ट्रिक करण्यास सज्ज झाला आहे. पण यापासून त्यांना रोखण्यासाठी स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील ट्रेलब्लेझर्स संघ देखील तयारीत आहे. सायंकाळी 7.30 पासून या सामन्याला सुरुवात होईल.
हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील सुपरनोव्हाजची बाजू वरचढ असून शनिवारी शेवटच्या साखळी सामन्यात त्यांनी ट्रेलब्लेझर्सला चुरशीच्या लढतीत हरविले आहे. 2018 व 2019 मध्ये सुपरनोव्हाजने ही स्पर्धा जिंकली होती. शनिवारच्या सामन्यात ते पराभवाच्या उंबरठय़ावर होते. पण शेवटच्या चेंडूवर बळी घेत निसटता विजय मिळविण्यात ते यशस्वी ठरले होते. 2 धावांनी विजय मिळवित सुपरनोव्हाजने अंतिम फेरीत स्थान मिळविताना मिताली राजच्या व्हेलॉसिटी संघाचे आव्हान संपवले. सुपरनोव्हाजतर्फे लंकेची अनुभवी खेळाडू सलामीवीर चमारी अटापटू जबरदस्त फॉर्ममध्ये असून तिने दोन सामन्यात 111 धावा फटकावल्या आहेत. ट्रेलब्लेझर्सविरुद्ध तिने आक्रमक फलंदाजी करीत 48 चेंडूत 67 धावा फटकावत स्पर्धेतील पहिले अर्धशतक नोंदवले. कर्णधार हरमनप्रीत दोन्ही सामन्यात 31 धावा काढून बाद झाली होती. त्यामुळे भारतीय संघाची कर्णधार असलेली हरमनप्रीत अंतिम लढतीत मोठे योगदान देण्यास प्रयत्नशील असेल.
ट्रेलब्लेझर्सनेही या स्पर्धेची दणक्यात सुरुवात करताना व्हेलॉसिटीचा केवळ 47 धावांत धुव्वा उडविला होता. इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन, भारताची अनुभवी झुलन गोस्वामी यांच्या भेदक माऱयासमोर व्हेलॉसिटीचा डाव गडगडला होता. मात्र शनिवारी सुपरनोव्हाजविरुद्ध त्यांना असे प्रदर्शन करता आले नव्हते. दोन सामन्यात 39 धावा करणाऱया कर्णधार स्मृती मानधनालाही अपेक्षित प्रदर्शन करता आलेले नाही. त्याची भरपाई करण्यास तीही उत्सुक झाली आहे. सलामीवीर दियान्द्रा डॉटिनने धावा केल्या आहेत. पण तिला मोठी खेळी करण्याची गरज आहे. दीप्ती शर्मा (नाबाद 43) व हरलीन देओल (15 चेंडूत 27) यांनी ट्रेलब्लेझर्सला विजयाच्या उंबरठय़ावर आणून ठेवले होते. हाच जोम सोमवारच्या सामन्यात ते पुढे चालू ठेवण्यास उत्सुक असतील.
स्पिनर्सची भूमिका या सामन्यातही महत्त्वाची ठरणार असून दोन्ही संघांकडे दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत. ट्रेलब्लेझर्सकडे टी-20 मधील अग्रमानांकित डावखुरी स्पिनर एक्लेस्टोन आणि राजेश्वरी गायकवाड आहेत तर सुपरनोव्हाजकडे भारताची स्टार लेगस्पिनर पूनम यादव व राधा यादव यांच्या स्वरूपात स्पिनर्स आहेत. राधा यादवने शनिवारी शेवटचे षटक टाकत ट्रेलिब्लेझर्सला विजयापासून रोखण्यात ती यशस्वी ठरली होती. त्यामुळे तिचा आत्मविश्वास निश्चितच दुणावलेला असून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा ती पुरेपूर प्रयत्न करेल. जलद गोलंदाजी विभागात ट्रेलब्लेझर्सकडे अनुभवी झुलन गोस्वामी तर सुपरनोव्हाजच्या द.आफ्रिकन आयाबोन्गा खाका व विंडीजची शकीरा सेल्मन यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. अंतिम फेरीत दोनदा खेळण्याचा अनुभव असल्याने दडपण हाताळण्याचा अनुभवही त्यांच्याजवळ आहे. दोन्ही संघांतील हा मोठा फरक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
संघ : सुपरनोव्हाज : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, चमारी अटापटू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया, शशिकला सिरिवर्धने, पूनम यादव, शकीरा सेल्मन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकार, आयुषी सोनी, आयाबोन्गा खाका, मुस्कान मलिक.
ट्रेलिब्लेझर्स : स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा, पूनम राऊत, रिचा घोष, डी. हेमलता, नुझहत परवीन, राजेश्वरी गायकवाड, हरलीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादुर, सलमा खातुन, सोफी एक्लेस्टोन, नाथकन चान्थम, दियांद्रा डॉटिन, कश्वी गौतम.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.