हर्ष पटेल, आदित्य हिरेमठ सामनावीर
प्रतिनिधी / बेळगाव
दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी 16 वर्षाखालील लीग क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सुपर एक्स्प्रेस अर्जुन स्पोर्ट्स संघाने सहारा स्पोर्ट्स संघाचा चार गडय़ांनी तर अलोन स्पोर्ट्स संघाने एक्सेस इलाईट संघाचा 28 धावांनी पराभव केला. हर्ष पटेल (सुपर एक्स्प्रेस), आदित्य हिरेमठ (अलोन स्पोर्ट्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर मंगळवारी सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सहारा संघाने 24.3 षटकात सर्व बाद 146 धावा केल्या. महादेव धारवाडकरने 65, जुबेर सावनूरने 18, रोहन तालबेलकरने 22 धावा केल्या. सुपर एक्स्पेस अर्जुन स्पोर्ट्सतर्फे ध्रुव देसाईने 24 धावात 2, सिद्धेश असलकरने 27 धावात 2 तर हर्ष पटेल व आकाश असलकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर सुपर एक्स्प्रेस अर्जुन स्पोर्ट्सने 24.3 षटकात 6 बाद 149 धावा करून सामना 4 गडय़ांनी जिंकला. सिद्धेश असलकरने 42, वृषल दोरकाडी व हर्ष पटेल यांनी प्रत्येकी 22 तर केशव मुक्कण्णावरने 21 धावा केल्या. सहारा स्पोर्ट्सतर्फे झुबेर सावनूर, राजेंद्र दंगण्णावर, शुभम पाटील, रोहन तालबेलकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात अलोन स्पोर्ट्ने 25 षटकात 6 बाद 164 धावा केल्या. आदित्य हिरेमठने 1 षटकार, 4 चौकारासह 34, रोषण बेकवाडकरने 32, कामिल बॉम्बेवालेने 22, ऋषिकेश पाटीलने 16 धावा केल्या. एक्सेस इलाईटतर्फे प्रवीण जर यादव, वृषभ पाटील यांनी प्रत्येकी 2 तर तेजस व सिद्धांत कदम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर एक्सेस इलाईटचा डाव 18.2 षटकात 136 धावात आटोपला. त्यात प्रभू साशलट्टीने 2 षटकार, 2 चौकारासह 27, अभिषेक बेलकीने 32, ऋषिकेश राजपूतने 22 धावा केल्या. अलोनतर्फे ओमकार देशपांडेने 44 धावात 2, सिद्धेंत हुल्लोळीने 24 धावात 2 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे व निवृत्त जवान अनिल असलकर, आशीर्वाद मंगल कार्यालयाचे संचालक योगेश दोरकाडी, गौस हाजी, विक्रम देसाई यांच्या हस्ते हर्ष पटेल याला तर दुसऱया सामन्यात मक्सूद बॉम्बेवाले, सादीक मुल्ला, प्रकाश पाटील, जयसिंह राजपूत यांच्याहस्ते आदित्य हिरेमठ याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
बुधवारचे सामने 1) साईराज हुबळी टायगर्स वि. सहारा स्पोर्ट्स, सकाळी 9.30 वा. 2) एमसीसीसी वि. अलोन स्पोर्ट्स, दु. 1.30 वा.
मालिकावीरासाठी सायकलचे बक्षीस
बेळगावचा क्रिकेटपटू व बेळगाव श्री किताब पटकावलेला शरीरसौष्ठवपटू प्रणय शेट्टी यांनी दीपक नार्वेकर क्रिकेट स्पर्धेत 16 वर्षाखालील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी गियर सायकल बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. त्यांचे वडील कै. रत्नाकर शेट्टी यांच्या स्मरणार्थ ही सायकल मालिकावीरचा बहुमान पटकावणाऱया खेळाडूस दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.