दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलॉक यांचे मत
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
पूर्णतः सुरक्षित वातावरण असेल तर क्रिकेट नेहमीप्रमाणे खेळता येईल आणि चेंडूला चकाकी आणण्यासाठी गोलंदाज लाळेचा वापरसुद्धा पूर्वीप्रमाणे करू शकतील. त्यावर बंदी घालण्याची गरज नाही, असे प्रतिपादन दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलॉक यांनी केले आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यावर बंदी घालण्याची आणि त्याऐवजी गोड पदार्थ वापरण्याची शिफारस आयसीसीच्या क्रिकेट समितीने अलीकडेच केली होती. बऱयाच कालावधीनंतर क्रिकेटला पुन्हा सुरुवात होणार असून विंडीज संघ लवकरच इंग्लंड दौऱयावर जाणार आहे. इंग्लंडने यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करीत बंदिस्त स्टेडियममध्ये कसोटी मालिका खेळविली तर खेळाडूंवर बंदीच्या अटी घालण्याची काही गरज नाही, असे पोलॉक यांना वाटते. ‘खेळाडूंना बबलसारख्या वातावरणात ठेवले जाईल. मग त्यांची चाचणी होईल आणि दोन आठवडय़ाच्या शिबिरात ठेवले जाईल. तेथे ते नुसतेच बसून राहतील. समजा या खेळाडूंमध्ये कोणतेच लक्षण आढळून आले नाही तर चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ वापरण्याचा प्रकार त्यांच्याकडून घडल्यास त्याला काहीच हरकत नसावी. कारण ते क्वारन्टाईनमध्ये असल्याने त्यांचा कोणाशीही संपर्क आलेला नसतो. अशा वेळी त्यांच्यावर क्रिकेट खेळताना नेहमीच्या गोष्टी करू देण्यात कोणतेही बंधन घातले जाऊ नये, असे मला वाटते,’ असे पोलॉक यांनी फॉलोईंग ऑन क्रिकेट पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने सुरक्षिततेसाठी काही उपाय योजले आहेत. त्यात जादा प्रवास टाळण्यासाठी केंद्राजवळच हॉटेलची व्यवस्था, पाहुण्या संघासाठी 14 दिवसांचे सक्तीचे क्वारन्टाईन आणि नियमित आरोग्य तपासणी या उपायांचा समावेश आहे. ‘सामने असणाऱया ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी नसेल, ते जेथे असतील तेथे निर्जंतुकीकरण करून स्वच्छ वातावरण ठेवणे, याशिवाय अन्य उपायही केले जातील. त्यामुळे लाळेचा वापर करण्याचे प्रकार धोकादायक ठरणार नाहीत, असे मला वाटते, असे पोलॉक पुढे म्हणाले. विंडीजचे माजी वेगवान गोलंदाज व समालोचक मायकेल होल्डिंग यांनीही पोलॉक यांच्या मताला सहमती दर्शविली. ‘एकदम सुरक्षित वातावरणात खेळत असताना लाळेच्या वापरावर बंदी घालणे तर्कसंगत वाटत नाही,’ असे होल्डिंग म्हणतात.
यावरून क्रिकेट विश्वात दुमत निर्माण झाल्याचे दिसत असून अनेक माजी व आजी क्रिकेटपटूंनी लाळेसाठी पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. त्यात भारताचा आघाडीचा जलद गोलंदाज जसप्रित बुमराहचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेबाबत तसेच लाळेवरील बंदीच्या प्रस्तावाबाबत बुधवारी होणाऱया आयसीसी कार्यकारी मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.