प्रतिनिधी/राजापूर
शिवसेनेच्या माजी सभापती उमेश पराडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रायपाटनचे सरपंच राजेश नलावडे यांना मारहाण केली. या मारहाणीत सरपंच नलावडे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान याप्रकरणी पराडकर यांचे बंधू मंगेश पराडकर यांनीही परस्पर विरोधी तक्रार दाखल केली आहे. नलावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल, शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रायपाटनचे सरपंच राजेश नलावडे व त्यांचे सहकारी संतोष गांगण वर्तमानपत्रात आलेल्या बातमीबाबत चर्चा करत होते. यावेळी उमेश पराडकर, मंगेश पराडकर, अमोल शेट्ये, जितू गांगण, महेंद्र गांगण, महेश ताम्हणकर, बाबा कांबळी यांनी जमाव करत नलावडे व संतोष गांगण यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये नलावडे व गांगण हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रायपाटन ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.
तर याप्रकरणी मंगेश पराडकर यांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल केली असून मी व माझे बंधू बोलत जात असताना राजेश नलावडे, संतोष गांगण, संजय नलावडे व संदीप कोलते यांनी रायपाटन गावाबाबत वर्तमान पत्रात आलेल्या बातमीबाबत विचारणा करून संशय घेत मनात राग धरून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.