जागतिक पातळीवर नरमाईचा सूर – सेन्सेक्स 175 अंकांनी मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात तेजी राहिली होती. यामध्ये बीएसई सेन्सेक्सने 175 अंकांची तेजी प्राप्त करत नवा विक्रम नोंदवत बाजार बंद झाला आहे. जागतिक बाजारातील वातावरण हे काहीसे नरमाईचे राहिले होते. शेअर बाजारातील टीसीएस, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि एचडीएफसी यांचे समभाग तेजीत राहिले होते.
प्रमुख समभागांच्या मदतीने शुक्रवारी सेन्सेक्स 175.62 अंकांसह 0.31 टक्क्यांनी वाढून निर्देशांक 56,124.72 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 68.30 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 16,705.20 वर स्थिरावत बंद झाला आहे.
आठवडय़ातील अंतिम सत्रात शुक्रवारी सेन्सेक्समधील अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग हे सर्वाधिक तीन टक्क्यांनी नफा कमाईत राहिले आहेत. यासोबत लार्सन ऍण्ड टुब्रो, डॉ. रेड्डीज लॅब, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, टीसीएस आणि कोटक बँक यांचे समभाग तेजीत राहिले होते. अन्य कंपन्यांपैकी इन्फोसिस, इंडसइंड बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, नेस्ले इंडिया आणि एचसीएल टेक यांचे समभाग मात्र नुकसानीत राहिले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अफगाणिस्तामधील झालेल्या अस्थिर वातावरणाचा प्रभाव हा जगभरातील अन्य देशांवर होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये आशियातील अन्य बाजारात शांघाय आणि सियोल हे लाभात राहिले तर, हाँगकाँग आणि टोकीओमधील बाजारात घसरणीचा कल राहिला होता. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.94 टक्क्यांनी मजबूत होत 71.74 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी संस्थात्मक गुंतवणुकीची निव्वळ विक्री राहिली असून साधारणपणे 1,974.48 कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री झाली आहे.