सेन्सेक्समध्ये 347 तर निफ्टीत 97 अंकांची वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
विदेशी भांडवल प्रवाहाच्या जोरावर बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांनी आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सर्वोच्च पातळी गाठण्यात यश मिळविले आहे. सेन्सेक्स 347 अंकांनी तर निफ्टी निर्देशांकाने 97 अंकांनी वाढ दर्शवली. सोमवारी सेन्सेक्स, निफ्टीच्या निर्देशांकाने सर्वात मोठी झेप घेतली आहे.
30 समभागांच्या बीएसई निर्देशांकाने आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी नोंदविली आहे. दिवसभराच्या व्यवहाराच्या दरम्यान सेन्सेक्स निर्देशांकाने 45,458.92 या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचे धाडस केले होते. दिवसअखेर सेन्सेक्स 347.42 अंकांनी वधारून 45,426.97 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 97.20 अंकांच्या वाढीसह 13,355.75 अंकांवर बंद झाला. निफ्टीनेही दिवसभराच्या कामगिरीत 13,366.65 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली होती. सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल ही कंपनी सर्वात लाभात राहिली. कंपनीचे समभाग 3 टक्क्यांनी वाढल्याचे दिसले. यासोबत एचयुएल, एचडीएफसी, आयटीसी, इंडसइंड बँक, एसबीआय, सनफार्मा, ओएनजीसी, टेक महिंद्रा, एल अँड टी आणि एशियन पेंट्स या कंपन्याही लाभात राहिल्या. दुसरीकडे कोटक बँक, नेस्ले इंडिया, टाटा स्टील, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी बँक या नुकसानीत राहिल्या. स्थानिक बाजाराने आपली मजबुती कायम ठेवली होती. जागतिक बाजारात घसरणीचा सिलसिला असला तरी त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर किंचीत मात्र दिसला नाही. कोरोना लसीबाबत सकारात्मक प्रगती त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबाबत रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नांमुळे सोमवारी बाजारात तेजी अखेरपर्यंत टिकून राहिली. अमेरिकन डॉलरमध्ये घसरण आणि अमेरिकेत प्रोत्साहनात्मक निधीसंदर्भात स्पष्टतेमुळे भारतासहित विकसीत देशांच्या विदेशी गुंतवणुकीत आगामी काळात वाढीची शक्यता दिसते आहे.
तज्ञांनी वर्तविली आहे. आशियातील शांघाई, हाँगकाँग आणि टोकीयो बाजार सोमवारी नुकसानीत राहिले. तर सेऊल बाजाराने मात्र तेजी दाखवली. युरोपातील बाजारात सुरुवातीच्या व्यवहाराच्या सत्रात घसरण दिसून आली. खरेदीच्या जोरावर निफ्टीने पाचव्या सलग दिवशी तेजी दाखवली. दुसरीकडे कोणतीही नकारात्मक बातमी नसल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसला. गुंतवणूकदारांनी बाजारावर आपला विश्वास कायम ठेवला होता. परदेशी गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 2 हजार 969.59 कोटींचे समभाग खरेदी केल्याचे सांगण्यात आले.