वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा परिणाम-ऑटो, बँकिंगसमभाग नुकसानीत
मुंबई
सतत वाढत जाणाऱया कोरोना रुग्णसंख्येचा परिणाम सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. दिवसभरात सेन्सेक्सचा निर्देशांक 1400 अंकांनी कोसळला होता. पण दिवसअखेर 870 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स आणि 229 अंकांच्या घसरणीसह निफ्टी निर्देशांक बंद झाला. ऑटो आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.
अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनच्या घोषणेमुळे दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत असून त्याचा परिणाम बाजारावरही दिसला आहे. सकाळी सेन्सेक्स 9 अंकांच्या किरकोळ घसरणीसह 50,020 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 29 अंकांच्या घसरणीसह 14,837.70 अंकांवर खुला झाला होता. दिवसअखेर मात्र सेन्सेक्स 870 अंकांच्या घसरणीसह 49,159.32 अंकांवर आणि निफ्टी निर्देशांक 229 अंकांच्या घसरणीसह 14,637.80 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्समधील 30 पैकी 25 समभाग नुकसानीसह बंद झाले. एकावेळी तर सेन्सेक्स निर्देशांक 1450 अंकांनी कोसळून 48,580.80 अंकांवर खाली आला होता. याअगोदर 26 मार्चला सेन्सेक्स 49 हजाराच्या खाली आला होता. कोरोना महामारीत लॉकडाऊनमुळे वसुली थांबणार असल्याने बँकांवर दबाव दिसून आला. बँकिंगच्या समभागांचा विचार करता सरकारी बँकांच्या समभागांची जोरदार विक्री झाली. कॅनरा बँकेचे समभाग 6 टक्के घसरले. ऑटो निर्देशांक 2.5 टक्के खाली आला तर आयटी निर्देशांक 511 अंकांनी म्हणजे 2 टक्के चढून 26,491 अंकावर बंद झाला.
मिळतेजुळते जागतिक संकेत लक्षात घेता बाजारात विक्रीचा जोर दिसून आला. कोरोना व्हायरस रुग्ण संख्येच्या वाढीमुळे शेअर बाजाराची दिशाच हरवल्याचे दिसले. एकाच दिवसात जवळपास 1 लाखापर्यंत रुग्ण आढळल्याने त्याचा नकारात्मक परिणाम बाजारावर उमटला. बँक व वित्तसंस्थांचे समभाग कमकुवत दिसून आले. आयटी कंपन्यांचे समभाग मात्र काहीसा आधार बाजाराला देत होते. सकाळी व्यवहारावेळी सेन्सेक्स निर्देशांक 1400 अंकांच्या पडझडीसह 48600 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 378 अंकांच्या घसरणीसह 14500 अंकांवर कार्यरत होता. इंडसइंड बँक व बजाज फायनान्स यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत होते. 5 टक्के इतकी घसरण यांनी नोंदवली होती तर दुसरीकडे इन्फोसिस, टीसीएस व एचसीएल टेक यांचे समभाग नफ्यात होते.
सेन्सेक्स कोसळल्याने बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल घटून 2 कोटी 3 लाख 40 हजार कोटी रुपयांवर घसरले. जपानचा निक्केई निर्देशांक 229 अंकांच्या वाढीसह 30,083 वर तर कोरीयाचा कोस्पी 8 अंकांच्या वाढीसह 3120 अंकांवर पोहचला होता. इस्टरमुळे ऑस्ट्रेलियातील बाजार सोमवारी बंद होते. चीन आणि हाँगकाँगमधील शेअर बाजारही बंद होते.