112 च्या पथकाला दिसेना, : महाविद्यालयातील युवकांकडून हुल्लडबाजी सुरु
प्रतिनिधी / सातारा
युवक कॉलेजला म्हणून घरातून येतात अन् साताऱयात आल्यानंतर सेव्हन स्टार इमारतीच्या आवारात भरकटत असतात. कोरोनाच्या अनुषंगाने कडक नियम केलेले असताना येथे मात्र युवकांकडून नियमांना तिलांजली दिली जात असल्याचे दिसून येते. 112 च्या फिरत्या गाडीला नियम मोडणारे युवक दिसत नसून त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही, अशी चर्चा सुरु आहे.
अनेक युवक महाविद्यालयीन शिक्षणासाठी साताऱयात मोठय़ा संख्येने येतात. या युवकांकडून महाविद्यालयात जाण्याऐवजी सेव्हन स्टार इमारतीच्या समोरील पार्किंगमध्ये बिनधास्तपणे मोबाईलवर टाईमपास तर कुठे गप्पांचा फड तर कुठे छेडछाडीचे प्रकार होत असतात. बसस्थानकात पाठीमागे बसचे जळीत कांड झाले त्यावेळीही उलटसुलट चर्चा सुरु होत्या. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी नियम काढले आहेत. परंतु त्यांच्या नियमांना तिलांजली देण्याचे काम युवकांकडून सुरु आहे. त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सचा भंग होत असून सुध्दा पोलिसांच्या पथकांना दिसत नाही. नियम मोडणाऱया युवकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सातारा शहर पोलीस मिडियाचे कॅमेरे दिसले की कारवाई करतात. त्याशिवाय विना मास्कवरची कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे सेव्हटनस्टार इमारतीच्या परिसरात महाविद्यालयीन युवकांकडून नियम मोडले जात आहेत. त्यांच्यावर कारवाई झाल्यास येथे होणारी गर्दी आटोक्यात येईल, अशी चर्चा आहे.
अण्णासाहेब विद्यार्थ्यांना शिस्त लावा सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे हे कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जातात. जसा समोरचा असेल त्याच्याशी तशाच पद्धतीने वागून सरळ करणाऱयांमध्ये ते वाकबगार आहेत. त्यांनी जरा बसस्थानकालगतच्या सेव्हन स्टार इमारतीच्या परिसरात उनाडक्या फिरत असणाऱया युवकांवर कारवाई केल्यास पोलिसांचा धाक बसेल. तसेच आगामी कालावधीत प्रशासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.