अवघ्या 19 व्या वर्षी कुस्तीत सर्वोच्च शिखरावर डंका वाजवण्याचे लक्ष्य, दहाव्या वर्षापासूनच गाजवल्या कुस्तीच्या ‘दंगली’
मदिना (सोनेपत) / वृत्तसंस्था
मदिना हे हरियाणाच्या सोनेपत जिल्हय़ातील छोटेसे खेडे. या खेडय़ातील युवा स्तरावरील नवोदित मल्ल सोनम मलिक वरिष्ठ गटात उतरली, त्यावेळी तिला गंभीर दुखापत होईल किंवा अगदी यामुळे तिची कारकीर्दच संपुष्टात येऊ शकेल, अशा स्वरुपाची भीती व्यक्त केली गेली होती. पण, प्रत्यक्षात या टिनेजर मल्ल सोनमने एकापेक्षा एक, सरस, अनुभवी अव्वल प्रतिस्पर्ध्यांना नमवले आणि आता ऑलिम्पिकचे सर्वोच्च व्यासपीठ गाजवण्यासाठी ती ताज्या दमाने सज्ज झाली आहे.
अवघ्या 19 वर्षांची सोनम मलिक 62 किलोग्रॅम वजनगटातून भारताचे प्रतिनिधीत्व करणार असून रिओ ऑलिम्पिकमधील पदकजेती महिला मल्ल साक्षी मलिकप्रमाणे पदक जिंकण्याचे स्वप्न बाळगून आहे. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा दि. 23 जुलैपासून सुरु होणे अपेक्षित आहे.
दोनवेळा वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिप जिंकणाऱया सोनम मलिकने आता स्वतःची ओळख प्रस्थापित केली असली तरी तिला लहान वयात वरिष्ठ गटातून खेळण्याची संधी मिळावी, यासाठी प्रशिक्षक अजमेर मलिक व तिच्या पालकांना नॅशनल फेडरेशनला तिच्या गुणवत्तेची झलक पटवून द्यावी लागली. अखेर 2019 मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि त्यानंतर तिला जानेवारी 2020 मधील रोम रँकिंग सिरीज इव्हेंटच्या चाचणी फेरीत खेळण्याची संधी लाभली. या चाचणीत तिने चक्क साक्षी मलिकला पराभवाचा धक्का दिला.
चाचणीतील या निकालानंतर आश्चर्यचकित झालेल्या भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष बी. बी. शरण म्हणाले होते, ‘आम्ही चाचणी न घेता सोनमचे नाव वगळले असते तर ती मोठी चूक ठरली असती’.
स्थानिक स्तरावर ‘दंगल’ होते, अशा मेळय़ात सोनम सातत्याने उतरायची आणि त्यात यश खेचूनही आणायची. नंतर तर अशा दंगलीत सोनमची कुस्ती, हेच आकर्षण केंद्र ठरु लागले. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच तिने आपली गुणवत्ता दाखवून दिली होती. पुढे खुल्या गटात आपल्या कौशल्याची झलक दाखवत तिने काही बडय़ा खेळाडूंना अस्मान दाखवण्यास सुरुवात केली. अगदी रितू मलिक, सरिता मोर, निशा किंवा सुदेश यांच्यासमोरही ती आक्रमकपणे खेळायची. तिचे प्रशिक्षकही यावर भारावून जायचे.
सोनमचा भाऊ मोहितने सोनम सराव अतिशय काटेकोरपणे करायची, याचा येथे उल्लेख केला. ‘प्रशिक्षकांनी 5 किलोमीटर धावून या, असे सांगितले तर आम्ही थोडे धावून 5 किलोमीटर धावल्याचे खोटे सांगायचो. सोनम मात्र अशी चूक कदापिही करत नसे’, असे तो म्हणाला. आता दोन महिन्याच्या आतच 19 वर्षांची सोनम ऑलिम्पिकमध्ये उतरेल, त्यावेळी तिच्याकडे गमावण्यासारखे काहीच नसेल आणि जिंकण्यासारखे मात्र बरेच काही असणार आहे!
जेव्हा सोनमने 2018 च्या दंगलीत स्कूटर जिंकली!
हरियाणातील खेडोपाडी, छोटय़ा-मोठय़ा शहरात कुस्त्यांचा मेळा भरतो, त्यास दंगल असे संबोधले जाते. 2018 साली आयोजित अशाच एका दंगलीत सोनमने आपल्यापेक्षा अव्वल प्रतिस्पर्ध्यांना नमवत स्कूटर जिंकली. शिवाय, 1 लाख 10 हजार रुपयांचे रोख इनामही पटकावले. आपल्या कारकिर्दीत तिने पाचवेळा भारत केसरी जेतेपदावर आपली मोहोर उमटवली.
लोकांनी टीव्हीवर आपली कुस्ती पहावी, हे स्वप्न!
2012 मधील एका आठवणीला उजाळा देताना सोनम म्हणाली, ‘आम्ही रोजचा सराव आटोपून टीव्हीसमोर बसलो आणि त्यावेळी सुशील कुमार, योगेश्वर दत्त यांना टीव्हीवर कुस्ती खेळताना पाहिले. त्याचवेळी मी मनोमन ठरवले की, लोकांनी आपली कुस्ती देखील टीव्हीवर पहायला हवी, यादृष्टीने प्रयत्न करेन. प्रत्येक कुस्तीत पदक जिंकणे आणि पदक वितरण सोहळय़ात तिरंगा फडकताना पाहणे, हे माझे स्वप्न असते. आता ऑलिम्पिकमध्ये देखील याच जोशात मी लढेन’.
सोनमच्या घरी कुस्ती हाच श्वास!
सोनम मलिकच्या घरी प्रत्येक सदस्याला कुस्तीची प्रचंड आवड आहे आणि यामुळे कुस्ती हाच त्यांच्या जिव्हाळय़ाचा विषय आहे. शिवाय, कुस्ती हाच त्यांचा श्वास देखील आहे. स्वतः सोनमला कुस्ती सोडून अन्य कोणत्याही विषयात स्वारस्य असत नाही. समर्पणाच्या भावनेमुळे देखील सोनम आजवर कुस्तीत बरीच यशस्वी झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही, हे तिने स्वतःला जणू बजावून ठेवलेले असते. जानेवारी 2020 मध्ये साक्षीविरुद्ध ती एकवेळ 6-10 फरकाने पिछाडीवर होती. पण, नंतर तिने अचानक मुसंडी मारली आणि विजयावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तिचे समाधान झाले. त्यानंतर सोनमने साक्षीविरुद्ध सलग 4 विजय संपादन केले.