यंत्रणेची सतर्कता आली फळास : पंचक्रोशीवरील संकट टळले
प्रतिनिधी / कुडाळ:
मुंबई येथून आलेल्या कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ कळसुली (सोनवडे-घोडगे) येथील पंधरा वर्षीय युवतीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सोनवडे-घोडगे, जांभवडे, भरणी पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली. मात्र, या प्रकरणाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन (महसूल), पोलीस व आरोग्य यंत्रणा अलर्ट असल्याचे स्पष्ट झाले.
खरोखरच ही सर्व यंत्रणा अलर्ट असल्याने संबंधित कुटुंबीय सोनवडे गावात जाण्यासाठी आले असले, तरी त्यांना गावापर्यंत पोहचू दिले नाही. त्यांना परस्पर कुडाळमध्ये आणून विलगीकरण करण्यात आले. त्यामुळे सर्व यंत्रणा अभिनंदनास पात्र ठरतात. दरम्यान, आरोग्य विभागाने सोनवडे, घोडगे, भरणी पंचक्रोशीतील गावांचा सर्व्हे सुरू केला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे.
सोनवडे येथील एका ज्येष्ठ व्यक्तीचे 19 एप्रिल रोजी पडून गंभीर दुखापत झाल्याने निधन झाले. त्यांचे दोन मुलगे व अन्य नातेवाईक मुंबईत होते. मृत्यूनंतर त्यांच्या येथील नातेवाईकांनी मृत्यू प्रमाणपत्र मुलांना पाठवून अंत्यविधीसाठी यावे, असे सांगितले. त्याप्रमाणे कायदेशीर अटी पूर्ण करून त्या कुटुंबातील मयत वृद्धाचे दोन मुलगे, सून व दोन नातवंडे असे पाचजण सोनवडे गावाकडे येण्यास निघाले. 20 एप्रिल रोजी सकाळी खारेपाटण चेकपोस्ट येथे ते आले असता, पोलीस यंत्रणेने त्यांना अडविले. मात्र, वडिलांचे निधन झाले आहे. अंत्यसंस्कारासाठी आम्हाला जायला हवे, असे त्यांनी सांगितले. संबंधित तपासणी यंत्रणेने तुम्ही जिल्हा रुग्णालयात जा. तपासणी करा व गावी जा, असे त्यांना सांगितले.
धोका न पत्करता यंत्रणेला केले सावध
चेकपोस्टवरील यंत्रणेला त्या कुटुंबियांनी आपण ओरोस येथे जातो, असे सांगितले असले, तरी ते गेलेच नाहीत, तर धोका उद्भवू नये, यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणा, जिल्हाधिकारी तसेच कुडाळ तहसीलदार व कुडाळ पोलीस ठाणे या सर्व यंत्रणेला माहिती देऊन सावध केले. त्यामुळे ते कुटुंबीय गावात पोहोचू नये, यासाठी कळसुली-हरडी फाटय़ावर (कणकवली-कुडाळ हद्दीवर) संबंधित यंत्रणेने थांबत मुंबईतून थेट सोनवडेत जाणारी गाडी थांबवून त्यांना तुम्हाला असे गावात जाता येणार नाही, असे सांगत तपासणीसाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आणले. पोलीस, जिल्हा प्रशासन (महसूल) व आरोग्य यंत्रणेच्या सर्व पथकाने याबाबत जी सतर्कता दाखविली. त्यामुळे ते कुटुंबीय गावात पोहोचले नाहीत आणि भविष्यातील मोठा धोका टळला.
‘त्या’ कुटुंबियांना ठेवले विलगीकरणात
सोनवडेत त्या कुटुंबाला जाऊ न देता तपासणी करून कुडाळ येथील शासकीय जागेत विलगीकरण करून ठेवण्यात आले होते. दरम्यान, 21 रोजी रात्री त्यातील एका मुलाला दम्याचा त्रास झाल्याने त्याला कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलविण्यात आले. त्यावेळी त्याचे नमुने घेण्यात आले असता ते निगेटिव्ह आले. त्यामुळे त्याला शासकीय वाहनाने सोनवडे येथे सोडण्यात आले, तर उर्वरित चौघांना कुडाळ येथे ठेवण्यात आले. कुडाळ येथे विलगीकरण करून ठेवण्यात आलेल्या त्या चौघांना ओरोस येथे नेऊन त्यांचे स्वॅब घेण्यात आले.
एका युवतीचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह
त्या कुटुंबातील एका युवतीचा काल रात्री प्राप्त झालेला अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून आरोग्य यंत्रणेसह जिल्हय़ात एकच खळबळ उडाली. युवतीचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याचे समजताच बुधवारी सकाळपासून आरोग्य, पोलीस व विलगीकरण कक्षातील ज्यांचा त्या कुटुंबियांशी संपर्क आला असण्याची शक्यता आहे, त्या सर्वांची यादी करण्यात येत आहे. तसेच तपासणी करण्याचे काम आरोग्य यंत्रणेने हाती घेतले आहे.
सोनवडेसह परिसरात आरोग्य पथकामार्फत तपासणी
संबंधित कुटुंब त्यावेळी सोनवडे गावात गेले नसले, तरी आरोग्य विभागाने सोनवडे, घोडगे, भरणी, जांभवडेसह गावात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी सुरू केली. ताप आहे का? तसेच अन्य लक्षणे कोणाला असल्यास तात्काळ आरोग्य विभागाला कळविण्याचे आवाहन केले आहे. पोलीस यंत्रणा घोडगे-सोनवडे पंचक्रोशीत लोकांनी गर्दी करू नये, या दृष्टीने लक्ष ठेवून आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका!
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन आवाहन करेल त्याप्रमाणे सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने करून ग्रामस्थांनी घाबरू नये. गावात गर्दी करू नये. मास्क वापरणे व प्रशासनाच्या अन्य नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घरातील चौघांना हलविले ओरोसला
घरातील पंधरा वर्षीय युवतीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने त्या घरातील चारही सदस्यांना बुधवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यात मुंबईहून आलेला व घरी आलेला तो युवक, त्याची आजी, काका व काकी अशा चौघांना ओरोस येथे नेण्यात आले.