सावियो कुतिन्हो यांचे पालिकेला, संबंधित आमदारांना आवाहन
प्रतिनिधी /मडगाव
शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी शॅडो कौन्सिलकडे सोनसडय़ाचे कामकाज सोपवण्याचे आवाहन मडगाव पालिका व संबंधित आमदारांना केले आहे. कमीत कमी मनुष्यबळ आणि यंत्रणेचे साहाय्य घेऊन मदत करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. या कामासाठी पालिकेकडे पैसे वा कोणत्याही प्रकारची आर्थिक मागणी केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
एसजीपीडीए किरकोळ मासळी मार्केटमध्ये सध्या सुरू असलेल्या बायोमिथेनेशन प्लांट साइटवर माध्यमांना संबोधित करताना कुतिन्हो यांनी सांगितले की, 9 जुलै रोजी होणाऱया पालिकेच्या बैठकीत काही नवीन प्रकल्पांविषयी चर्चा करण्यासाठी त्यांचा मुद्दा कार्यक्रमपत्रिकेत समाविष्ट केला आहे. तथापि कोणत्या प्रकारचे प्रकल्प प्रस्तावित केले जात आहेत यासंबंधी आवश्यक सविस्तर तपशील त्यात नाही. सार्वजनिक तिजोरीतून याचा सर्व खर्च केला जाणार असल्याने यासंदर्भात पालिका व संबंधित आमदारांनी जनतेला खरी माहिती पुरवावी, अशी मागणी कुतिन्हो यांनी केली आहे.
सोनसडा येथे कचरा प्रक्रिया सुविधा सुरू करण्याबाबत घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने सादर केलेले प्रात्यक्षिक आणि सूचनांवर निर्णय घेण्यासाठी पालिका बैठकीत सूचना सादर करण्यापूर्वी बैठकीच्या नोटिसा नगरसेवकांना बजावल्या गेल्या आहेत. हा सर्व प्रकार अत्यंत संशयास्पद असल्याचा दावा कुतिन्हो यांनी केला आहे. बायोमिथेनेशन प्रकल्प साइटवर या एकंदर समस्येकडे लक्ष वेधण्याचे कारण म्हणजे 2.42 कोटी खर्चाच्या 4 टन क्षमतेच्या प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भातील कामांवर प्रकाश टाकणे हे असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकल्प मावळत्या पालिका मंडळाने प्रत्येकी 4.81 कोटीच्या प्रकल्पांना दिलेल्या मंजुरीपेक्षा निम्म्या खर्चाचे आहेत, असे यावेळी नजरेस आणून देण्यात आले.
शनिवारी पत्रकार परिषदेत मडगाव आणि फातोर्डा येथील दोन्ही आमदारांनी केलेले विधान खरोखरच गोंधळात घालणारे आहे, असा दावा त्यांनी केला आहे. सध्या बायोमिथेनेशन प्रकल्प उभारला जात असल्याने त्याच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांना शंका आहे. मात्र बायोमिथेनेशन प्रक्रिया सर्वांसाठी पूर्णपणे नवीन आहे. तथापि अर्ध्या किमतीच्या बायोमिथेनेशन प्रकल्पाचा प्रयोग करणे निश्चितच दुप्पट किमतीच्या प्रकल्पापेक्षा अधिक योग्य पर्याय आहे, याकडे कुतिन्हो यांनी लक्ष वेधले.