नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून केरळमध्ये गाजणाऱया सोने तस्करी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईत निलंबित आयएसएस अधिकारी एम. शिवशंकर यांना अटक करण्यात आली आहे. ते केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे सचिव होते. तस्करी प्रकरण बाहेर आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. या तस्करी प्रकरणाचे धागेदोरे बडय़ा राजकीय मंडळींपर्यंत आहेत. या प्रकरणाची सूत्रधार स्वप्ना सुरेश नामक महिला असून तिचे केरळमधील अनेक राजकारण्यांशीही घनिष्ट संबंध असल्याचा आरोप होत आहे. शिवशंकर यांना या महिलेची सर्व कृत्ये माहित होती. तरीही त्यांनी एक वरिष्ठ सरकारी अधिकारी या नात्याने कोणतीही कारवाई केली नव्हती. उलट या महिलेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोप संचालनालयाने ठेवला आहे.
उच्च न्यायालयात याचिका : शिवशंकर यांनी उच्च न्यायालयात याचिका सादर करून अटक टाळण्याचा प्रयत्न केला. तथापि न्यायालयाने याचिका फेटाळली. त्यानंतर त्यांना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला. 5 जुलै 2020 या दिवशी स्वप्ना सुरेश यांनी संयुक्त अरब अमिरातीतून 30 किलो सोने केरळमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. सोन्याने भरलेली बॅग गोपनीय सरकारी कागदपत्रांची असल्याचे भासवत त्यांनी सीमाशुल्क अधिकाऱयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विमानतळावर केला, ही बाब उघड झाली होती. त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे थेट बडय़ा राजकारण्यांपर्यंत जाऊन पोहचल्याचा आरोप होऊ लागला होता. त्यामुळे समाजमाध्यमांवरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याची हाताळणी एनआयए करीत आहे.