1014 बेड उपलब्ध : वसतिगृहेही ताब्यात घेणार : आज-उद्या कडक लॉकडाऊन : पालकमंत्र्यांची माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ातही शनिवार व रविवारी दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता कडक लॉकडाऊन असणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सोमवारनंतर होम आयसोलेशन बंद केले जाणार आहे. त्यामुळे 1,014 बेड उपलब्ध करण्यात आले असून सामाजिक न्याय भवन आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाची वसतिगृहे ताब्यात घेतली जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली, त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे, जान्हवी सावंत, नागेंद्र परब, लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
लॉकडाऊनची सक्त अंमलबजावणी
शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून सिंधुदुर्ग जिल्हय़ातही याची सक्त अंमलबजावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हय़ातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात 10.01 टक्के एवढी पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याची स्थिती आहे. तर जिल्हय़ाचा मृत्यूदर 2.5 एवढा आहे. जिल्हय़ात सध्या 46 टक्के रुग्ण होमआयसोलेशनमध्ये आहेत, तर 13 टक्के रुग्ण शासकीय आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्हय़ातील या स्थितीमुळे दोन दिवस कडक लॉकडाऊन करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हय़ातील जनतेने सहकार्य करावे. दोन दिवसांच्या लॉकडाऊननंतर सोमवारी जिल्हाधिकारी बैठक घेणार असून या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोरोनावरील 1170 डोस शिल्लक
जिल्हय़ात सद्यस्थितीत 1170 एवढे कोरोनावरील लस डोस शिल्लक आहेत. जिल्हय़ातील 56 केंद्रांपैकी केवळ तीन केंद्रांवर लस दिली जात आहे. उर्वरित सर्व केंद्रे बंद असून जिल्हय़ासाठी दोन लाख लसींची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी वेळेत पूर्ण न झाल्यास जिल्हय़ातील लसीकरण पूर्णपणे बंद होईल. ही लस केंद्र शासन राज्य शासनाला पुरवते आणि राज्य शासन सर्व जिल्हय़ांना पुरवते, अशी स्थिती आहे. असे सांगताना केंद्र शासनाकडून राज्याला आवश्यक असलेली लस पुरविली जात नसल्याचेच त्यांनी सूचित केले. जिल्हय़ात सद्यस्थितीत रेमेडेसिवीरची 1 हजार 470 इंजेक्शन उपलब्ध आहेत. तर अजूनही इंजेक्शन्स येणार आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांना इंजेक्शन्स आवश्यक असल्यास रुग्णांची सत्यता पटवून इंजेक्शन्स दिली जाणार आहेत.
यापुढे होम आयसोलेशन बंद
सिंधुदुर्ग जिल्हय़ात सद्यस्थितीत 1014 एवढे बेड असून पैकी 386 बेड ऑक्सिजनचे आहेत, तर 67 व्हेंटिलेटर बेड आहेत. जिल्हय़ात अजून बेडची आवश्यकता भासल्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागातील महाविद्यालयांची वसतिगृहे आणि सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे ताब्यात घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांना करण्यात आल्या आहेत. जिल्हय़ात प्रत्येक तालुक्मयाच्या ठिकाणी कोरोना सेंटर सुरू करण्याचे निश्चित केले आहे. यापुढे कोरोना रुग्णाला घरी राहून उपचार घेण्यास मनाई करण्यात येणार आहे. होम आयसोलेशनमध्ये नियम पाळले जात नाहीत, अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे संसर्गही वाढत आहे, असे निरीक्षणात आले आहे. प्रत्येकाला संस्थात्मक आयसोलेशनमध्येच उपचार घ्यावे लागणार आहेत. असेही यावेळी पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील वाढत्या कोरोनामुळे आणि कडक उन्हाळय़ामुळे आता चाकरमानी गावी येणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना रुग्ण आणखी वाढू शकतात. त्यामुळे चाकरमान्यांबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.
केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु!
जिल्हय़ात पुढील दोन दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. बाकी काहीही सुरू नसणार, असे यावेळी पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या कालावधीत कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केले.