25 जण झाले कोरोनामुक्त : सक्रिय रुग्णसंख्येत वाढ
प्रतिनिधी / बेळगाव
सोमवारी बेळगाव जिल्हय़ात कोरोनाचे 21 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुक्त झालेल्या 25 जणांना घरी जाऊ देण्यात आले. सक्रिय रुग्णसंख्या वाढतीच आहे. 302 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
सोमवारी पॉझिटिव्ह आलेले 21 पैकी 17 जण बेळगाव शहर व उपनगरांतील आहेत. रुक्मिणीनगर, पार्वतीनगर, अनगोळ, टिळकवाडी, हनुमाननगर, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, नानावाडी, शहापूर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. याबरोबरच अथणी, अकोळ, मुडलगी, कोननकेरी येथेही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या 21 जणांमध्ये दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 27 हजार 621 हून अधिक झाली आहे. त्यापैकी 26 हजार 948 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 344 जणांचा मृत्यू झाला आहे. 302 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
अद्याप 37 हजारहून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. त्यामुळे साहजिकच रुग्णसंख्येत वाढ होत चालली असून 2 हजार 956 जणांचे अहवाल यायचे आहेत. आतापर्यंत 5 लाख 97 हजार 179 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 63 हजार 372 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.
रमेश जारकीहोळी यांना कोरोना माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या गोकाक येथील तालुका इस्पितळात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. गोकाक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र अंटीन यांनी ही माहिती दिली आहे. रमेश जारकीहोळी यांचा कारचालक व स्वयंपाकी यांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उपलब्ध माहितीनुसार 29 मार्च रोजी ते गोकाकला आले होते. दुसऱया दिवशी 30 मार्च रोजी कोल्हापूर महालक्ष्मीचे दर्शन घेऊन घरी परतल्यानंतर त्यांना ताप आला. त्याच दिवशी रात्री तालुका इस्पितळात त्यांची तपासणी करण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. रविवारी 4 एप्रिल रोजी रात्री श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.