आयुक्त पि. शिवशंकर यांची माहिती
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
राज्यात उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी मनपा ‘खावटी अनुदान योजना’ राबवणार असल्याची माहिती मनपा आयुक्त पि. शिवशंकर यांनी मंगळवारी दिली.
अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजने मान्यता मिळाली आहे. 2020-21 या एका वर्षासाठी योजनेचा कालावधी आहे. खावटी अनुदान योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना 4 हजार रुपये प्रति कुटुंब अनुदान दिले जाणार आहे. ज्यामध्ये 2 हजार रुपये किमतीच्या वस्तू स्वरूपात वाटप, तर 2 हजार रुपये रक्कम त्यांच्या डाक खात्यात वितरित करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यास संदर्भात सोलापूर हद्दीतील महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेतील 1 ते 8 झोन कार्यालयामध्ये दोन अधिकारी नेमण्यात येतील. त्या अधिकाऱ्यांमार्फत त्यांचे सर्वेक्षण करून फॉर्म भरून घेण्यात येतील. तरी या योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.
यांना मिळणार लाभ
-या योजनेअंतर्गत मनरेगा वर एक दिवस कार्यरत असलेल्या आदिवासी मजूर 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत, आदिम जमाती सर्व कुटुंबे, पारधी जमातीचे सर्व कुटुंबे, जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने प्रकल्प जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित केलेली गरजू आदिवासी कुटुंबे, ज्या कुटुंबामध्ये घटस्फोटीत महिला, विधवा, भूमिहीन शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेले कुटुंब, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब, वैयक्तिक वनहक्क धारक कुटुंबास लाभ अनुज्ञेय आहे.
यांना साधा संपर्क
-खावटी अनुदान योजनेबाबत सोलापुर जिल्हा समन्वयक बी. जे. वाघमारे (९८८१९८६८३८२), डी. जे अनारसे (९८८१८९९०८२ ३), एस. डी. जाधव (९७३०९८०४९५) यांना संपर्क साधावा.