तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
बोरिवलीहीन बार्शीकडे जाणाऱ्या एसटी बसच्या चाकाखाली आल्याने वृद्ध महिला प्रवास्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना दि. ३ रोजी कुर्डुवाडी बसस्थानकात दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. नाजरबाई भास्कर भडकवाड (वय ७१, मुळगाव सुर्डी, ता. बार्शी, हल्ली रा. गौतमनगर, सहजपूर ता दौंड) असे मृत महिलेचे नाव आहे.
सदर एसटी बस (क्रमांक एमएच १४ बीटी ३२३१) ही बोरिवलीहून बार्शीला निघाली असताना कुर्डुवाडी बसस्थानकात थांबा घेऊन बार्शीकडे निघाली असता सदर महिला बसच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाली.अपघात इतका भयंकर होता की महिलेच्या डोक्यातून मेंदू बाहेर रस्त्यावर पडला होता.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर महिलेस पुण्याकडे जायचे होते. परंतू ती महिला या बार्शी कडे जाणाऱ्या बसमध्ये चढली. वाहकाने सदर बस पुण्याकडे जात नसल्याचे सांगितल्यानंतर ती महिला बसमधून खाली उतरली होती. त्यानंतर हा अपघात घडला.