प्रतिनिधी / बार्शी
कोरोना या विषाणूची लागण आता बार्शी शहरांमध्ये पसरत असून आता बार्शी पोलिसांनाही धोरणाविषयी या विषाणूची लागण होत असल्याचे चित्र आहे. काल दिनांक 24 रोजी सायंकाळी साडे नऊ वाजता आलेल्या अहवालामध्ये बार्शीतील चार रुग्णांचे रिपोर्ट कोरोना बाधित आले होते. त्यापैकी वैराग येथील दोन असून बार्शी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे दोन पोलिसांचा समावेश आहे. हे दोन पोलीस बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या असल्याचे समजते.
सविस्तर वृत्त असे की दिनांक 19 जून रोजी बार्शी तालुका पोलीस ठाणे चा दवाखाना ड्युटीसाठी कार्यरत असणारा पोलीस शिपाई यास खोकला व श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यास व बार्शी तालुका पोलीस ठाण्यात इतर 3 कर्मचारी यांचा दिनांक 23 जून रोजी स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी २ कर्मचारी यांचे अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचारी यांचे संपर्कातील एकूण 12 पोलीस हे हायरिस्क मोड मध्ये असून 17 पोलीस हे लो रिस्क मध्ये आहेत. या सर्व पोलीस यांची यादी तयार करण्यात आली आहे. या मध्ये बार्शी तालुका पोलीस ठाण्यातील १ अधिकारी १३ कर्मचारी व बार्शी शहर पोलीस ठाणे येथील तीन कर्मचारी व तीन होमगार्ड यांचा समावेश आहे . यातील हाय रिस्क पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना संस्थात्मक विलगिकरण लो रिस्क मधील कर्मचाऱ्यांना घरीच अलगिकरण करण्यात आले आहे.
बार्शी शहर पोलीस ठाणे शेजारील नवीन पोलीस लाईन मधील दोन इमारती ह्या प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आल्या व संबंधित दोन्ही इमारतीमधील पोलीस कर्मचारी यांना त्यांची तपासणी करून कर्तव्यावर येण्याकरिता स्वतंत्ररीत्या लॉजिंग वर बाहेर ठेवण्यात आले आहे. संबंधित तसेच सर्व पोलीस कुटुंबीयांचे टेंपरेचर तसेच ऑक्सीजन लेवल बाबत तपासणी करून घेण्यात आली आहे. अशी माहिती बार्शी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली आहे.