करमाळ्यातील एकाची चार लाख रुपयांची फसवणूक
प्रतिनिधी / करमाळा
साधूचा वेश परिधान करून पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने करमाळा शहरातील व्यक्तीला लुटणाऱ्या दोन भोंदू साधूंना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली. अन् चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दत्तात्रय महादेव शेटे (रा. शिवाजीनगर, करमाळा) यांना साधूच्या वेशातील दोन व्यक्तींनी विश्वासात घेऊन पैसे दुप्पट-तिप्पट करण्याचे आमिष दाखवले. साधूंवर विश्वास ठेवून शेटे यांनी चार लाख 50 हजार रुपयांची रोकड हिरडगाव फाटा (ता. श्रीगोंदा) येथे साधूंजवळ सोपवली. पैसे दुप्पट होण्याच्या समजाने शेटे यांनी मोठी लोखंडी पेटीबरोबर आणली. पैसे पेटीत ठेवण्याच्या बहाण्याने साधूंनी हातचलाखी करून पैसे लांबवले. शेटे यांनी दोन दिवस वाट पाहिल्यावर पैसे दुप्पट तर झालेच नाहीत उलट आत ठेवलेले पैसे गायब झाल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेटे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
गुह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गट करत आहेत. दरम्यान पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना 16 ऑगस्टला खबऱयामार्फत माहिती मिळाली की, थेऊर (ता. हवेली, जि. पुणे) येथील दोन बनावट साधूंनी हे कृत्य केले आहे. निरीक्षक ढिकले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवले.
पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी संतोष साहेबराव देवकर (वय 45), अशोक फकीरा चव्हाण (वय 45, दोघेही रा. जाधव वस्ती थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी फसवणुकीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. फसवणूक केलेल्या रकमेपैकी संतोष देवकर याच्याकडून एक लाख 70 हजार रुपये व अशोक चव्हाण याच्याकडून दोन लाख पाच हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, दोन मोबाईल असा मिळून चार लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींविरुद्ध यापूर्वीही जुन्नर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, फौजदार अंकुश ढवळे, पोलीस नाईक गोकुळ इंगवले, मुख्य हवालदार प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादा टाके, अमोल कोतकर, प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गट व पोलिस कर्मचारी किरण भापकर करत आहेत.
आरोपी हे साधूच्या वेषात लोकांना औषधी वनस्पती, रुद्राक्ष विक्री करण्याचा व भीक्षा मागण्याचा बहाणा करुन विश्वास संपादन करत, नंतर जवळीक साधत आर्थिक अडचणीतले, कर्जबाजाऱयांची कौशल्याने माहिती घेऊन पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत जाळ्यात ओढत. त्यानंतर निर्जन ठिकाणी रात्रीचे वेळी पैसे घेऊन बोलावून फुलावर पैसे ठेवून हातावर तांदूळ देत. त्यानंतर डोळे मिटून प्रदक्षिणा घालण्यास सांगत. त्याचदरम्यान हातचलाखीने नजर चुकवून पैसे काढून घेऊन, एका पिशवीत फुले भरून पिशवीचे तोंड बंद करून वाहनाच्या डिक्कीत ठेवण्यास सांगत. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत उघडू नका नाहीतर पैसे दुप्पट होणार नाहीत, अशी भीती दाखवत. अन् दुसऱ्या दिवशी मात्र पैसे दुप्पटीच्या आमिषाने पिशवी उघडल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात येत असे.