अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची माहिती
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर :
मराठा समाजाला एसीबीसी किंवा ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधव यांच्या मागणीवरून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून रविवार, 4 जुलै रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मोर्चा काढणारच, असेही पाटील यांनी सांगितले.
मराठा आरक्षणासंदर्भात रविवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. शहरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल. यावेळी नरेंद्र पाटील यांनी राज्यातील सोलापुरातील मोर्चा सर्वात मोठा होणार असल्याचे सांगितले. मोर्चात सोलापूर शहर व इतर जिह्यातील मराठा बांधव लाखेंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व नरेंद्र पाटील करणार आहेत. त्याचबरोबर या मोर्चासाठी उदयनराजे भोसले, संभाजीराजे, खासदार नारायण राणे, शिवेंद्रराजे भोसले आदी प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव, किरण पवार, श्रीकांत घाडगे, सोमनाथ राऊत, प्रताप कांचन आदी उपस्थित होते.