मोहोळ तालुक्यातील शिरापूर परिसरातील घटना
हल्ला करणारा बिबट्या कोंडी परिसरातीलच असल्याची शक्यता
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
मोहोळ तालुक्यातील शिरापूर परिसरात मंगळवारी सकाळी शेतात बिबट्याने वारशाचा फडशा पाडला. कोंडी परिसरात दिसलेल्या बिबट्यानेच हा हल्ला केला असावा, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कोंडी एमआयडीसी परिसरात गेल्या आठवड्यात बिबट्या दिसला होता. वाढलेल्या झुडपांच्या परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसेही सापडले होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून कोठेच बिबट्याच्या हालचाली दिसल्या नाहीत. बिबट्या परत आपल्या अधिवासात गेला असावा, अशी चर्चा असतानाच मंगळवारी पहाटे मोहोळ तालुक्यातील शिरापूर परिसरात दिग्वीजय ताकमागे यांच्या शेतामध्ये असलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. बंदिस्त असलेल्या वासराला बिबट्याने शेतात ओढत नेले आहे. हल्ला करुन वासराचा पोटाकडील भाग खल्ल्याचे दिसून येत आहे.
घटनेची माहिती कळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. ज्या ठिकाणी वासरु मृतावस्थेत पडले आहे त्या भागात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. कोंडी परिसरात दिसलेला बिबट्या आता शिरापूर परिसरात आला असावा असा अंदाज वन परिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार यांनी व्यक्त केला आहे