मनपाकडे 459 कोटींची थकबाकी : मार्चमध्ये 24 कोटी तिजोरीत
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
महापालिका प्रशासनाने कोरोनानंतर मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मागील व चालू वर्षातील कर वसुलीवर भर दिला आहे. यामध्ये बड्या थकबाकीदारांवर निशाना साधत जून 2020 ते मार्च 2021 या नऊ महिन्याच्या कालावधीत तब्बल 116 कोटी रुपयांची वसुली मनपा प्रशासनाने केली आहे. थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी लावून यातील 24 कोटी रुपये केवळ मार्च महिन्यात वसूली केली असल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.
सन 2020 मध्ये कोरोना काळात महापालिकेच्या उत्पन्नाचे सर्वच स्त्रोत बंद राहिले. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीत शहराच्या विकासालाही ब्रेक लागला होता. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट जाणवू लागला. आयुक्तांनी कर थकबाकी, गाळे थकबाकी आदी वसुलींवर भर दिला आहे. सन 2020-21 या आर्थिक वर्षातील मागील थकबाकी 338 कोटी 40 लाख 68 हजार तर चालू वर्षातील 121 कोटी 49 लाख 83 कर असे एकूण 459 कोटी रुपये इतकी आहे. जून महिन्यांपासून ही वसुली मोहीम कडक करीत एक लाखांपुढील थकबाकीदारांची यादी तयार करून त्यानुसार कारवाई सुरू केली.
जून 2020 ते फेब्रुवारी 2021 या आठ महिन्याच्या कालावधीत मागील थकबाकीपैकी 33 कोटी 50 लाख 15 हजारांची वसुली केली. तर चालू करामधील 59 कोटी 54 लाखांची कर भरणा झाली. मार्च महिन्यात ही मोहीम आणखी तीव्र करीत थकबाकीदाराच्या घरासमोर ढोल, हलगी लावून कर वसुली सुरू झाली. साधारण मागील थकबाकी 10 कोटी तर 13 कोटी 70 लाख रुपये असे एकूण वसुलीचे 20 टक्के रक्कम 24 कोटी रुपयांची कर भरणा केवळ एका मार्च महिन्यात झाली असल्याचेही उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.
सन 2020-2021 मागील थकबाकी – 338 कोटी 40 लाख 68 हजार 49 रुपये चालू डिमांड – 121 कोटी 49 लाख 83 हजार 903 रुपये एकूण थकबाकी – 459 कोटी 90 लाख 51 हजार 952 रुपये मागील थकबाकीपैकी वसुली – 44 कोटी 36 लाख 5 हजार 221 रुपये चालू डिमांडपैकी वसुली – 72 कोटी 54 लाख 28 हजार 67 रुपये एकूण वसुली – 116 कोटी 90 लाख 33 हजार 288 रुपये |