लातूर / प्रतिनिधी
ट्रॅक्टर हेड वाहून नेणारा ट्रक व कार यांचा अपघात होऊन लातूरच्या पाडे कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार, दि. 31 डिसेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास येडशी (ता. उस्मानाबाद) येथे घडला.
शुक्रवारी सकाळी उस्मानाबाद येथील कार्यक्रम पार पाडून पाडे कुटुंबीय लातूरकडे कारने (एमएच 24-एए 8055) जात होते. सकाळी आठच्या सुमारास उस्मानाबाद जवळील आळणी येथून जात असताना कार आणि ट्रकचा (एमएच. 04-एफबी 2055) अपघात झाला. या भीषण अपघातात कार अक्षरश ट्रकच्या खाली आली होती. या अपघातात उमेश मुरलीधर पाडे, पत्नी सविता उमेश पाडे, मुलगा प्रतीक उमेश पाडे, आई हिरकणाबाई मुरलीधर पाडे या चौघांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मयत पाडे कुटुंबीय लातूरच्या प्रकाशनगर भागातील रहिवासी आहेत. उमेश पाडे हे लातूर येथेच हॉस्टेल चालवत होते, अशी माहिती उपलब्ध होत आहे.