माढा तालुक्यातील नागरिकांमधून संतप्त सवाल
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कोरोनाने माढा तालुक्याला विळखा घातला असून आजपर्यंत १५० हून अधिक नागरिकांना याने गिळंकृत केले आहे असे असताना आपले लोकप्रतिनिधी गप्प कसे? कुठे आहेत लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारत आहेत.
माढा तालुक्यात कोरोनाचा कहर झाला असून तालुक्यातील आरोग्यसेवा कोलमडली आहे.
तालुक्यात केवळ चार हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटल म्हणून परवानगी मिळालेली आहे. बाधित रुग्ण संख्या इतकी आहे की हे चारही हॉस्पिटल अपुरे पडत आहेत. रुग्ण हॉस्पिटल च्या दारोदारी फिरत आहेत.परंतू लवकर बेड उपलब्ध होत नाहीत. यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून उपाययोजना केली पाहिजे.जे डॉक्टर स्वतःहून कोविड रुग्णासाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देण्यास तयार आहेत त्यांना ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत त्या अडचणी कशा दूर करता येतील यासाठी प्रयत्न करुन त्यांना लवकरात लवकर मंजुरी कशी देता येईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
कुर्डुवाडी शहरातील दुसरे कोविड केअर सेंटर नुकतेच चालू झाले आहे. त्याबरोबर ऑक्सिजन सुविधेसह कोविड हॉस्पिटल उभारणे गरजेचे आहे. बाधित रुग्णसंख्या अधिक असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल अपुरे पडत आहेत. रुग्ण व नातेवाईकांना हॉस्पिटल मधील शिल्लक बेड शोधण्यात दमछाक होत आहे. किमान २०० बेडचे सुविधायुक्त कोविड हॉस्पिटल आपल्या तालुक्यात उभा राहिल्यास रुग्णाची हेळसांड होणार नाही आणि नातेवाईकाचीही दमछाक होणार नाही.
राजकारण हे आयुष्याला पुरलेले असते. काही थोडा काळ असतो त्या काळात समाजकारण करुन आशीर्वाद मिळवायची हीच संधी असते. परंतू अशा काळात जर आपण यांना उपयोगी पडलो नाहीत तर आपल्या सारखे कपाळ करंटे आपणच आहोत हे विसरून चालणार नाही.