-वैराग परिसरातील घटना – दोघांना मारहाण करुन लांबवले साडेचार लाख रुपये
प्रतिनिधी / सोलापूर
कमी किमतीत सोने घेण्यासाठी गेलेल्या दोघांना मारहाण करुन साडेचार लाख रुपये काढून घेतले. कोयता आणि तलवारीने धमकावत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. स्वस्तातील सोने महागात पडल्याने दोघांनी गयावया करुन जीव वाचविला. ही घटना बार्शी तालुक्यातील वैराग परिसरात 20 एप्रिल रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
हिरा अंबरग्या चव्हाण (वय 32, रा. रामनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली. त्यावरुन सचिन भोसले, जहाँगीर भोसले, शोभा भोसले व इतर चार (सर्व रा. वैराग ता. बार्शी) अनोळखींविरुध्द वैराग पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे पुणे येथे गवंडी काम करतात. त्याचबरोबर ठेकेदारीही करतात. एक वर्षापूर्वी आरोपी सचिनला फिर्यादीने मजुर म्हणून काम दिले. त्यानंतर कोरोना संसर्ग वाढल्याने आरोपी सचिन गावी वैराग येथे परतला होता. गावात परतल्यानंतर नातेवाईकांना दोन किलो सोने सापडले असून, निम्म्या किमतीत देतो असे आमिष दाखवून तो फिर्यादीला सतत फोन करत होता. या आमिषाला बळी पडून फिर्यादी आणि त्यांचे भाऊजी असे दोघे 13 एप्रिल रोजी सचिनच्या घरी आले. त्याने दिलेला सोन्याचा तुकडा तपासण्यास नेला. तो खरा असल्याचे सराफाने सांगितल्याने फिर्यादीचा विश्वास बसला.
त्यानंतर 20 एप्रिल रोजी पुन्हा फिर्यादी व भाऊजी साडेचार लाख रुपये घेऊन सोने घेण्यासाठी आरोपीच्या घरी आले. तेव्हा आरोपी सचिनची आई शोभा हिने पिवळ्या धातुच्या पट्टया त्यांच्या समोर ठेवल्या. फिर्यादीला सोन्याविषयी संशय आल्याने, त्याने या व्यवहारास नकार दिला. तेथून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच आरोपींनी बळजबरीने फिर्यादीकडील साडेचार लाख रुपये काढून घेतले. आरोपी जहॉगीर आणि सचिन भोसलेंनी धारदार शस्त्रे उगारुन धमकावले. तर इतर आरोपींनी लाकडाने बेदम मारहाण केली. यावेळी फिर्यादी आणि त्याचा भाऊजी आरोपींकडे आम्हाला सोडा, पैसे नाही दिले तरी चालतील म्हणून गयावया करु लागले.
दरम्यान, बाहेर कोणीतरी आल्याचे सांगून सर्व आरोपींनी तेथून पळ काढला. त्यानंतर जखमी अवस्थेत फिर्यादी भाऊजीसह एसटी स्टॅन्डवर गेला. तेथून ते पुणे येथे पोहचले. यानंतर घटनेची नोंद आज वैराग पोलीस ठाण्यात केली आहे. वैराग पोलीस पुढील तपास करीत आहेत.